१५ वर्षांत पक्षाची सतत घसरण; नेत्यांचे दुर्लक्ष

तगडय़ा प्रतिस्पर्ध्याशी मूठभर कार्यकर्ते लढत असताना केवळ अंतर्गत राजकारणामुळे बालेकिल्ला असलेल्या एखाद्या शहरातून पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात येण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली आहे. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर सुरू झालेली पिंपरी-चिंचवड काँग्रेसची घसरण निर्णायक पातळीवर आली आहे. पिंपरीचे शहराध्यक्ष सचिन साठे व त्यांच्या समर्थकांनी पक्षाच्या विविध पदांचे राजीनामे दिल्यानंतर आता काँग्रेससमोर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

पिंपरी पालिकेच्या स्थापनेपासून (१९८२) शहराच्या राजकीय वर्तुळात काँग्रेसचा प्रभाव होता. शरद पवार सुरुवातीला शहराचे राजकारण पाहात होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर, काँग्रेसची ताकद विभागली गेली. राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे गेले, तर काँग्रेसची धुरा मोरे यांच्याकडे होती. पवार व मोरे यांच्यातील संघर्ष व सहकार्याचे राजकारण पिंपरी-चिंचवडकरांनी बराच काळ अनुभवले. २००२ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बरोबरीने काँग्रेसने जागा पटकावल्या, त्यामुळे पालिका ताब्यात घेण्यासाठी पवारांना अनिच्छेने मोरे यांचे सहकार्य घ्यावे लागले. कुरबुरी आणि सुप्त संघर्षयुक्त वाटचाल करत पाच वर्षांचा सत्तेचा कालावधी पूर्ण झाला. दरम्यान, २००३ मध्ये मोरे यांचे निधन झाले. त्यानंतर, शहर काँग्रेसची अवस्था पोरक्याप्रमाणे झाली. २००७ च्या पालिका निवडणुकीत बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आता काँग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न प्रथमच स्वबळावर राष्ट्रवादीने पिंपरी पालिकाजिंकली, तेव्हा काँग्रेसचे जेमतेम १९ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर, २०१२ मध्येही काँग्रेसची घसरण कायम राहिली. जेमतेम २० नगरसेवक निवडून आले. २०१७ मध्ये काँग्रेसला खातेही खोलता आले नाही.

मोरे यांच्या निधनानंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने हनुमंत गावडे, श्रीरंग बारणे, गौतम चाबुकस्वार, भाऊसाहेब भोईर, हनुमंत भोसले, बाबासाहेब तापकीर अशा स्थानिक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन दुसरीकडे सोयरीक केली. आझम पानसरे आले आणि पुन्हा दुसरीकडे गेले. बारणे व चाबुकस्वार शिवसेनेत गेले, खासदार आणि आमदार झाले. गावडे, भोईर राष्ट्रवादीकडून एकापाठोपाठ स्वीकृत नगरसेवक झाले. माजी मंत्री सुरेश कलमाडी, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम यांनी पिंपरीत येऊन काँग्रेसचे अंशत: नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या पदरी अपयशच आले. चार वर्षांपूर्वी सचिन साठे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा आली होती. त्याआधीच पक्ष खुळखुळा झाला होता. भोईर व त्यांचे समर्थक नगरसेवक राष्ट्रवादीत गेले होते. साठे यांना नेतृत्वाकडून ताकद मिळत नव्हती. पक्षाने वाऱ्यावर सोडल्याप्रमाणे पक्षाची अवस्था होती. प्रतिकूल परिस्थितीत पक्ष जिवंत ठेवणाऱ्या साठे यांना नैराश्यातून राजीनामा देण्याची वेळ आली. त्यांच्या पाठोपाठ सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने आता शहरात काँग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.