पक्षाकडे नकारार्थी दृष्टिकोनातून पाहू नका, पक्षाचे वाईट चिंतू नका, नेत्यांविषयी उघडपणे बोलू नका, पक्षाचे विषय प्रसारमाध्यमांकडे नेऊ नका, असे खडे बोल काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना सुनावले. राष्ट्रवादीच्या विरोधात गेल्यास पद काढून घेऊ, अशी धमकी राष्ट्रवादी नेते देत असल्याची तक्रार करणाऱ्या विरोधी पक्षनेते विनोद नढे यांना, तसे होत असल्यास राजीनामा द्या, स्वाभिमान गहाण टाकू नका, अशी जाहीर सूचनाही त्यांनी केली.
पिंपरीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली तसेच विविध मुद्दे उपस्थित केले, त्याचा परामर्श घेत साठे म्हणाले, काँग्रेसमध्ये पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे. आपापसात मतभेद नकोत. काँग्रेस कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, यापुढे गुणवत्ता डावलली जाणार नाही आणि वशिल्याने कोणाची वर्णी लागणार नाही. कार्यकर्त्यांनी नाउमेद होण्याचे कारण नाही. शहरात पक्षाचे कार्यालय लवकरच सुरू करू. राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठवले म्हणून पद काढून घेऊ, अशी धमकी राष्ट्रवादीचे नेते देत असल्याचे नढे यांनी सांगितले. त्याचा संदर्भ देत धमक्या येत असल्यास राजीनामा द्या, अशी सूचना शहराध्यक्षांनी केली.
काँग्रेसचे ‘मिशन २०१७’; फिक्सिंग होणार नाही
पिंपरी महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसने १२८ जागांवर उमेदवार दिले नव्हते. राष्ट्रवादीशी आतून हातमिळवणी केलेल्या काँग्रेस नेत्यांनी उमेदवारच मिळाले नाहीत, अशी सबब पुढे केली होती. तेव्हा झालेल्या दारुण पराभवानंतर बरेच नाटय़ घडले होते. हा संदर्भ देत शहराध्यक्ष सचिन साठे यांनी, काँग्रेसचे ‘मिशन २०१७’ मध्ये प्रत्येक जागेवर काँग्रेसचा उमेदवार राहील आणि ते न जमल्यास राजीनामा देऊ, असे स्पष्ट केले आहे.