मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका आहे. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. तसेच भाजपच्या नेत्यांनी, या माध्यमातून आग लावण्याची कामे करू नये आणि अशी कामे बंद करावी, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाच्या नेत्यांवर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सडकून टीका केली. पुणे येथील काँग्रेस भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सचिन सावंत बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर देखील उपस्थित होते.

यावेळी सचिन सावंत म्हणाले की, “मागील सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांना कधीच विश्वासात घेतले नाही. पण महा विकास आघाडी सरकारने सर्वांना सोबत घेऊन, आरक्षणाच्या मुद्यावर काम केले आहे. हे पाहून भाजपच्या नेत्यांमध्ये पोटदुखी दिसून येत आहे.” यातूनच भाजपचे नेते समाजात अपप्रचार करण्याचे काम करीत आहे, हे त्यांनी लवकर थांबवावे, अशी मागणीही सावंत यांनी केली. मराठा आरक्षणासारख्या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकार आपली भूमिका का जाहीर करत नाही असा सवालही सचिन सावंत यांनी विचारला.

चला घेऊ छत्रपतींचा आशिर्वाद म्हणणारे सत्तेत आल्यावर छत्रपतींना विसरले असून संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात तीन वेळा पत्र पाठवले. भेटीची वेळ मागितली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिला नाही याचा अर्थ केंद्र सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी अनुकूल नसल्याचे दिसत आहे. अशा शब्दांत सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.