पिंपरीत काँग्रेसमध्ये गटबाजीच्या राजकारणात पराकोटीचा संघर्ष सुरू असताना, माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर व त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून ‘बारामती’ गाठली. प्रारंभी शिवसेना व नंतर भाजपमध्येही भोइरांच्या प्रवेशाची चर्चा आहे. आपण काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे ते अधून-मधून सांगत असतात. अशातच, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘सदिच्छा’ भेट घेतल्याने पुन्हा चर्चेला निमित्त मिळाले आहे.
प्रथेप्रमाणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिवाळी पाडव्याला पवारांना भेटण्यासाठी बारामतीत येतात, यंदा भेटणाऱ्यांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. पिंपरीतून महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, माजी महापौर आझम पानसरे व पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने आले होते. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक नगरसेवक राजेंद्र जगताप आणि शत्रुघ्न काटे यांनीही बारामतीत येऊन आपले पवार प्रेम कायम असल्याचे दाखवून दिले. या गराडय़ात काँग्रेसचे भोईर व त्यांच्या समर्थक नगरसेवकांच्या हजेरीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
भोईर स्वत:ला काँग्रेसचे ‘निष्ठावंत’ म्हणून घेतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा शहराध्यक्ष सचिन साठे यांच्याशी संघर्ष सुरू आहे. आजी-माजी शहराध्यक्षांच्या वादात प्रदेशाध्यक्षांनी मध्यस्थी करून चर्चाही केली. मात्र तोडगा निघाला नाही. कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर पालिकेच्या निवडणुकीनंतर पुन्हा बसण्याचे ठरले होते. अद्याप तसे काही झाले नाही. मध्यंतरी भोइरांची शिवसेनेत प्रवेश करण्याविषयी चर्चा होती. उद्धव ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली होती. भाजपशीही त्यांचा ‘घरोबा’ आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांना नाटय़परिषदेच्या कार्यक्रमाला बोलावून राजकीय वर्तुळात चर्चा घडवून आणली. आता ते ‘बारामती’ला गेले होते.