राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी, बहुतांश खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे घरून काम (वर्क फ्रॉम होम) आणि तापमानवाढीमुळे वाढलेला उकाडा, या सर्वांचा परिणाम म्हणून यंदाही घरातील वीजवापर वाढून घरगुती वीजबिलांत वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी टाळेबंदीच्या काळात अशाच स्थितीत नागरिकांना वाढीव वीजबिले आल्याने राज्याभरातून तक्रारींचा पाऊस पडला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा नियंत्रित वीजबिलासाठी आपापला वीजवापर दररोज तपासण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये गेल्या वर्षी ऐन उन्हाळ्यात टाळेबंदी करण्यात आली होती. संपूर्ण संचारबंदी आणि बहुतांश कामगारांनी घरून कामाचा पर्याय स्वीकारला होता. या कारणांनी कुटुंबातील सर्वच सदस्य घरात होते. त्याचबरोबर वाढलेल्या उकाड्यामुळे वीजवापर वाढला होता. याच काळात वीज आयोगाने मंजुरी दिल्यानुसार वीजदरात काही प्रमाणात वाढ झाली होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून नागरिकांना वाढीव वीजबिले आली आणि त्याचा उद्रेक झाला. तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर वीजबिले समजाऊन सांगताना महावितरणच्या नाकीनऊ आले होते.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत आता संचारबंदी लागू करण्यात आली असून, उकाडा आणि कामाबाबत घरात गेल्या वर्षीसारखीच स्थिती निर्माण झाली आहे. कार्यालयीन कामे घरातून सुरू आहेत. दिवसा उन्हाच्या झळा आणि रात्रीचा उकाडाही वाढल्याने पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रणेचा वापर १८ ते २४ तास होण्याची शक्यता आहे.
दरआकारणी कशी वाढेल?
दरमहा सरासरी ८० ते ९० युनिट किंवा २८० ते २९० वीजवापर असलेल्या ग्राहकांचा वीजवापर सध्याच्या काळात अनुक्रमे १०० किंवा ३०० युनिटपेक्षाही अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज दराच्या दुसऱ्या टप्प्यात वापर गेल्यास त्या टप्प्याचे वाढीव पैसे ग्राहकाला द्यावे लागतील. घरगुती विजेच्या वापरासाठी १ एप्रिल २०२१ पासून लागू झालेल्या वीजदरानुसार प्रतियुनिट १ रुपये ३८ पैशांचा वहन आकार आहे. १०० युनिटपर्यंतच्या टप्प्याला प्रतियुनिट ३ रुपये ४४ पैसे, १०१ ते ३०० युनिटच्या टप्प्याला ७ रुपये ३४ पैसे, ३०१ ते ५०० युनिटच्या टप्प्याला प्रतियुनिट १० रुपये ३६ पैसे आणि ५०० युनिटपेक्षा अधिक वीजवापराला ११ रुपये ८२ पैसे दर आहे.
उन्हाळ्यामुळे…
सध्या संचारबंदीमुळे बहुतांश नागरिक घरात असून, उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. परिणामी घरातील पंखे, वातानुकूलित यंत्रणा, कुलर, दूरचित्रवाणी संच, संगणक, लॅपटॉप आदी उपकरणांचा वापर अधिक होत आहे. त्यामुळे विजेचा वापरही वाढणार आहे.
महावितरण म्हणते…
उपकरणांचा अनावश्यक वापर टाळावा आणि मीटरमध्ये रोजचा वीजवापर तपासावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि सार्वजनिक सेवांच्या वर्गवारीतील ग्राहकांना संभाव्य वीजबिलाची पडताळी महावितरणचे मोबाइल अॅप आणि http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर करता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.