कोणत्याही उद्योगात नव्याने भरती करताना कंत्राटी कामगारांच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या अनुभवावर बढती देण्यात यावी व त्यांचे किमान वेतन २५ हजार रुपये करावे, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी केली.
भारतीय कामगार सेनेच्या अ‍ॅक्सिस बँक युनिटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांच्या परिषदेत महाडिक बोलत होते. शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, उपाध्यक्ष मनोहर भिसे, अजित साळवी, चिटणीस जयसिंग पोवार, शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण आदी त्या वेळी उपस्थित होते.
महाडिक म्हणाले, नागरिकांवर अन्याय होतो, तेव्हा शिवसेना आवाज उठवते. आम्हा लाल दिव्यासाठी नव्हे, तर जनतेसाठी सत्ता हवी आहे. त्यामुळेच कामगारांनी भारतीय कामगार संघटनेवर विश्वास दाखवला. सध्या अनेक कामगार संघटनांचा धंदा झाला आहे. कामगार कायद्यांची माहिती नसणारे दहा-बारा गुंडांना घेऊन संघटना स्थापन करतात.
कुचिक म्हणाले, आपल्या स्वप्नातला िहदुस्थान घडविण्यासाठी केवळ उद्योगपतीच नव्हे, तर श्रम करणारे कामगारही महत्त्वाचे आहेत. राज्यात तीस लाख कंत्राटी कामगार आहेत. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निष्कर्ष निघाला नाही, तर प्रत्येक जिल्ह्य़ातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल.
कामगारांच्या प्रश्नावर ‘मन की बात’ करावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मधून प्रत्येक घटकाशी संवाद साधतात. १ मे रोजी त्यांनी कामगार दिनानिमित्त कामगारांच्या प्रश्नावर ‘मन की बात’ करावी, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांसाठी ‘समान काम, समान वेतन’ हे धोरण राबविणे गरजेचे आहे. यासाठी राज्याच्या अर्थमंत्र्यांकडे आयोग नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.