बारमध्ये बिल देण्यावरुन ग्राहक आणि कर्मचाऱ्यामध्ये वाद झाल्याने मध्यस्थीसाठी आलेल्या बाऊन्सरने हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. शहराच्या मध्यवस्तीत हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ग्राहक आणि बाऊन्सरसह १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्यातल्या मंगळवार पेठेतील वसंत बारमध्ये सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या बारमध्ये अक्षय काळोखे, संतोष बोराटे आणि सागर आगलावे या तिघांनी मद्यपान आणि जेवण केलं. त्यानंतर बिलावरून या तिघांचा बारमधील कर्मचाऱ्याशी वाद झाला.

हे तिघेही मद्यपान आणि जेवणाचं बिल ते देत नसल्याने हा वाद वाढत गेला. दरम्यान, या वादाचे रुपांतर थेट बाचाबाचीत झाल्याने मध्यस्थीसाठी आलेला बाउन्सर महिमाशंकर तिवारी याने थेट पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. ‘वसंत बार’ हा सदानंद शेट्टी या राजकीय नेत्याच्या मालकीचा आहे. नुकताच त्यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात ग्राहक आणि गोळीबार करणाऱ्या बाउन्सरसह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.