माझ्यामध्ये दडलेली अवखळ आणि खोडकर मुलगी मला सतत बडबडी ठेवते.. पण एकदा का तानपुरा घेऊन रियाजाला बसले की आठवतात ते गुरुचे संस्कार आणि मिळालेली घराण्याची तालीम. केवळ गाणं चांगलं असून उपयोगाचे नाही; गाण्यातील आशय आणि सादरीकरण उत्तमच असले पाहिजे याची दक्षता घेते. त्यामुळेच माझे गाणे युवकांना भावत असावे.. या शब्दांत पतियाळा घराण्याची युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती हिने जणू आपल्या गायनाचे गुपित उलगडले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापामध्ये कौशिकी हिने विविध प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे देताना अनौपचारिक गप्पांची मैफल रंगविली. संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी कौशिकीचा सत्कार केला.
‘‘शास्त्रीय संगीत फारसे न ऐकणारे श्रोतेही आपले गाणे ऐकतात, हा अभिप्राय म्हणजे माझ्या गायनाला मिळालेली दाद आहे असेच समजते. मी ३३ वर्षांची आहे. त्यामुळे २० वर्षांचा युवा रसिक डोळ्यासमोर ठेवून मी मैफल सादर करते. एरवी मी बडबडी आणि दंगेखोर मुलगी असले तरी एकदा स्वरमंचावर गेल्यावर मी माझ्या सुरांशी प्रामाणिक असते. केवळ गाणं चांगलं असून उपयोगाचे नाही. तर, गाण्यातील आशय आणि सादरीकरण हेदेखील उत्तमच असले पाहिजे, हा धडा मी उस्ताद झाकिर हुसेन यांच्याकडून घेतला. उस्ताद अमजद अली खाँ यांचा ‘स्टेज अॅपिअरन्स’ मला आवडतो. शाळेत असताना ‘गोड दिसणारी मुलगी’ हीच माझी ओळख असल्याचा फायदा अनेकदा घेतला. ‘स्टेज अॅपिअरन्स’साठी मी वेगळे काही करत नाही,’’ असे कौशिकी चक्रवर्ती हिने सांगितले.
शास्त्रीय संगीताच्यादृष्टाने बनारस आणि लखनौ ही श्रीमंत शहरे असली तरी महाराष्ट्र, कर्नाटक आणि बंगाल या प्रांतांनी गुणवत्ता आणि सातत्य या गुणांच्या साहाय्याने शास्त्रीय संगीत आपल्यामध्ये केवळ रुजविलेच नाही तर, संगीताचे जतन आणि संवर्धनही केले. बाबांमुळे (पं. अजय चक्रवर्ती) घरामध्ये गाण्याचे संस्कार झाल्याने मी याच क्षेत्रामध्ये येणे हा माझा जन्मसिद्ध हक्कच आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या ऑफर्स आल्या तरी तो प्रांत आपला नाही हे मला समजले. अर्थात गायन हे काही माझे ‘प्रोफेशन’ नाही, असे सांगताना कौशिकीने अत्यानंद आणि नैराश्य दूर करून मानसिक संतुलन साधण्यासाठी संगीत उपयुक्त आहे, असे मत व्यक्त केले. ‘लागी लागी लागी रे लगन चितचोर’ या गाण्याने तिने या मैफलीची सुरेल सांगता केली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2014 रोजी प्रकाशित
कौशिकीने उलगडले आपल्या गायनाचे गुपित
गाण्यातील आशय आणि सादरीकरण उत्तमच असले पाहिजे . त्यामुळेच माझे गाणे युवकांना भावत असावे.. या शब्दांत पतियाळा घराण्याची युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती हिने जणू आपल्या गायनाचे गुपित उलगडले.

First published on: 11-01-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conversation with kaushiki chakravarti