गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख शिखरावर असल्याचे आयआयटी कानपूरमधील ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मणिंद्र अग्रवाल यांच्या गणितीय प्रारूपानुसार दिसून आले आहे. आता मुंबई, पुण्यासह राज्यातील रुग्णसंख्या उतरणीला लागणार असून टप्प्याटप्याने रुग्णसंख्येत घट होत जाईल, अशी शक्यता डॉ. अग्रवाल यांनी वर्तवली आहे.

गणितज्ञ डॉ. मणिंद्र अग्रवाल यांना गणितातील संशोधनासाठी पद्माश्रीसह शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासारख्या महत्त्वाचे पुरस्कारही मिळाले आहेत.

त्यांनी करोना प्रादुर्भावाच्या अभ्यासासाठी ‘सूत्र’ हे गणितीय प्रारूप विकसित के ले आहे. आतापर्यंत देशभरातील विविध राज्यांतील रुग्णसंख्येची नोंद त्यांच्या गणितीय प्रारूपानुसार होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच पहिल्या लाटेवेळीही त्यांनी वर्तवलेला अंदाज योग्य ठरला होता. दुसऱ्या लाटेदरम्यान महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचे शिखर ११ एप्रिल ते १ मे दरम्यान येईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

गणितीय प्रारुप आणि वाढत्या संसर्गाविषयी डॉ. अग्रवाल यांनी लोकसत्ताला माहिती दिली.

‘गणितीय प्रारूपानुसार महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने शिखर गाठले आहे. तर पुणे आणि मुंबईने शिखर गाठून उतरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या उतरणीला लागेल. महाराष्ट्रात सध्या ६० हजार ते ६२ हजार रुग्णांची दैनंदिन नोंद होत आहे. मात्र ही संख्या आता कमी व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्या कमी होत जूनमध्ये लाट ओसरेल असे सांगता येईल,’ असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

देशातील रुग्णसंख्येबाबत अंदाज काय?

गेल्या काही दिवसांत देशातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढली आहे. एका दिवसात २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील रुग्णसंख्या हा कळीचा मुद्दा आहे. ‘देशातील रुग्णसंख्येचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र देशातील रुग्णसंख्येच्या अंदाजाबाबत अद्याप अनिश्चितता आहे. काही काळापूर्वी २५ एप्रिलच्या सुमारास देशातील रुग्णसंख्या शिखर गाठेल असे वाटले होते. गेल्या चार दिवसांतील रुग्णसंख्या पाहता देशातील रुग्णसंख्या कधी शिखर गाठेल या बाबत विश्वासाने मांडणी करता येत नाही. मात्र १५ मेपर्यंत देशातली रुग्णसंख्या शिखर गाठेल असा अंदाज आहे, असे डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले.

प्रारूप कसे काम करते?

गणितीय प्रारूपामध्ये ‘डिफ्रन्शियल इक्वेशन’चा वापर केला जातो. त्यात तीन मुख्य निकष निश्चित केलेले आहेत. या निकषांचे घटकमूल्य रोजच्या रुग्णसंख्यांच्या आकडेवारीवरून ठरवले जाते. या घटकमूल्यामध्ये बदल होतात. कधी सरकारचे धोरण बदलले, टाळेबंदी लागू झाली, मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडले, मुखपट्टी वापरली नाही अशा कारणांनी घटकमूल्ये बदलतात.  या घटकमूल्यानुसार रुग्णसंख्येचा अंदाज वर्तवला जातो, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.