News Flash

#coronavirus : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा व महाविद्यालये राहणार बंद

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश; आयटी कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी घरून काम करू देण्याचीही सूचना, शॉपिंग मॉल ३१ मार्च पर्यंत बंद राहणार

कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम लक्षात घेता, सदर विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णांकडून दुसऱ्या व्यक्तीस किंवा इसमास तसेच त्यांच्या संपर्कात आल्याने इतर व्यक्तीस होण्याची शक्यता विचारात घेवून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, खडकी, देहूरोड व पुणे कटक मंडळ तसेच शहर हद्दीलगतच्या गावांमधील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

आदेशापर्यंतच्या कालावधीत दहावी आणि बारावीसह इतर सर्व प्रकारच्या परीक्षा नियोजनाप्रमाणे सुरू राहतील, परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करताना दोन विद्यार्थ्यांमध्ये एक बाक रिकामा ठेवावा, एका बाकावर एकच विद्यार्थी असेल अशी व्यवस्था करावी, जे विद्यार्थी मागील एका महिन्यांमध्ये परदेशातून आलेले आहेत त्यांच्या परीक्षेची व्यवस्था स्वतंत्र कक्षामध्ये करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या आहेत.

याचबरोबर जे विद्यार्थी मागील एका महिन्यांमध्ये परदेशातून आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी १५ दिवस स्वतःच्या घरामध्ये ते जिथे राहत असतील तेथे विलगीकरण/अलगीकरण करणे आवश्यक आवश्यक आहे. तसेच असे विद्यार्थी व संशोधन सहायक जर वसतीगृहात राहत असतील तर त्यांचे विलगीकरण करण्यासाठी आपल्या विद्यापिठात व विद्यापिठाच्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयात व शैक्षणिक संस्थामध्ये वेगळी इमारत किंवा जागा सुनिश्चित करावी जेणे करुन कोरोना विषाणूची लागण इतर विद्यार्थांना होणार नाही, याची जबाबदारी सक्षम अधिकाऱ्यास देण्यात यावी. विलगीकरण कक्ष स्थापन करतांना संबंधित महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेवून त्यांच्या पर्यवेक्षकीय नियंत्रणाखाली सदरची कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या आहेत.तसेच, आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर भारतीय दंड संहिता कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशात म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांना निवासस्थानातून कामे करण्याची परवानगी द्यावी –
कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील ज्या उद्योग आस्थापनामध्ये जसे माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आदिंसारख्या सेवा आणि इतर उद्योग क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या निवासस्थानातूनच त्यांचे कार्यालयीन कामे करता येणे शक्य आहे. त्यामुळे संबंधित उद्योग आस्थापनाच्या उत्पादन किंवा सेवा आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नसेल अशा उद्योग आस्थापनांनी त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2020 पर्यंत त्यांच्या निवासस्थानातून कार्यालयीन कामे करण्याबाबत परवानगी देण्याबाबतचा योग्य तो निर्णय तात्काळ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी परिपत्रकान्वये केले आहे.

शॉपींग मॉल ३१ मार्चपर्यंत बंद –
पुणे जिल्हयामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हयातील सर्व शॉपींग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापनामध्ये अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3, व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. शासनाच्या या आदेशाची अवज्ञा करणा-या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना व्हायरसची बाधा झालेला आज आणखी एक रुग्ण आढळला आहे. काल पाच रुग्ण आढळले होते त्यामुळे केवळ २४ तासांत पिंपरी-चिंचवडमध्ये सहा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा रुग्ण जपान व दुबईवरून भारतात परतला होता. काल त्याची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत तो पॉझिटिव्ह आढळला. सध्या स्थितीस पिंपरी-चिंचवडमधील रूग्णांची संख्या ९ व पुणे शहारातील रूग्ण संख्या ७ आहे. दोन्ही मिळून पुण्यातील रुग्णांचा आकडा १६ झाला आहे. तर, संपूर्ण राज्यातील रुग्णांची संख्या ३३ वर पोहचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 9:47 pm

Web Title: coronavirus schools colleges in pimpri chinchwad closed msr 87 svk 88
Next Stories
1 ज्याच्या हाती वाढणं असतं तो आपल्या माणसाला जास्तच वाढतो : चंद्रकांत पाटील
2 #coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळला आणखी एक रुग्ण
3 Coronavirus : चंद्रकांत पाटलांनाच आदेशाचा विसर; घेतली शेकडो पदाधिकाऱ्यांची बैठक
Just Now!
X