‌ देशभरासह राज्यात सध्या करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचे संकट निर्माण झालेले आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेपासून सर्वसामान्य माणसाची आर्थिक गणितं बघिडल्याचे दिसत आहे. त्यात आता करोनाच्या तिसऱ्या लाटेचं देखील भाकीत वर्तवलं गेलं आहे. परिणामी मागील वर्षभरापसून व्यवसाय ठप्प असल्याने व आता पुढे देखील लवकर परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्ह दिसत नसल्याने, अनेकांनी मिळेल ते काम करून आपला प्रपंच चालवण्यासाठी खटपट सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रसिद्ध बॅण्ड व्यावसायिकांने देखील आपल्या दुकानात आता भाजपीला व अन्य किराणा सामान विक्री सुरू केली आहे.

पुण्यात ८२ वर्षांपासून शहरातील लग्न सोहळे, गणपती मिरवणूक यासह तब्बल १४० हून अधिक चित्रपटामध्ये बॅण्ड वादन करून, रसिक प्रेक्षकांची प्रभात बॅण्डने मन जिंकली आहेत. मात्र करोना महामारीचा फटाका अन्य व्यवसाप्रमाणे या व्यवसायावर देखील झाला आहे. लग्न सोहळ्यांवर मर्यादा आणल्याने, हा व्यवसाय ठप्प झाला आहे.

मूळ व्यवसायच ठप्प झाल्याने विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी आता या प्रसिद्ध बॅण्ड व्यावसायिकांने आपल्या दुकानात भाजी व अन्य साहित्य विक्री सुरू केली आहे. ”सध्या स्थितीस आपल्या हाताला काम नाही, त्यामुळे रिकामे बसू नका, एखादं काम हातचं गेल म्हणून नैराश्यात जाऊ नका. कोणत्याही कामाची लाज बाळगू नका आणि हे पण दिवस जातील.”, असे आवाहन प्रभात बॅण्ड व्यवसायातील तिसर्‍या पिढीतील अमोघ सोलापूरकर यांनी केले आहे.

१९३८ मध्ये झाली प्रभात बॅण्डची सुरूवात –
या पार्श्वभूमीवर प्रभात बॅण्ड व्यवसायातील तिसर्‍या पिढीतील अमोद सोलापूरकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, १९३८ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर, नातूंच्या वाड्यात प्रभात बॅण्डची स्थापना झाली. तेथून आजपर्यंत शहरासह राज्याच्या अनेक भागात आम्ही प्रभात बॅण्डच्या माध्यमातून सेवा देण्याचे काम केले आहे. या प्रवासाला जवळपास आता ८२ वर्ष झाली आहेत.

या क्षेत्रात आजवर अनेक चढ उतार पाहिले. पण या करोनामुळे आपल्या सर्वांचे जीवन बदलून टाकले असून याचा फटका आम्हाला देखील बसला आहे. मात्र आम्ही काही घरात बसून राहीलो नाही. तर आमचा काही वर्षांपुर्वी भाजीपाला विक्री व्यवसाय होताच, तो या महामारीत पुन्हा सुरू केला. पण आमचा बॅण्ड व्यवसाय सुरू झाल्यावर, पुन्हा आम्ही त्याकडे वळणार आहोत. तसेच, या व्यवसायाला चालना कशा प्रकारे मिळेल याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी देखील यावेळी सोलापूरकर यांनी केली.