शहरात सोनसाखळी चोरी करणारी मोठी टोळी पकडल्यानंतरही सोनसाखळी चोरीच्या घटना थांबण्यास तयार नाहीत. गेल्या दोन दिवसांमध्ये शहरात पाच सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये तब्बल साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. 
गेल्या आठवडय़ात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या इराणी टोळीला पकडून तब्बल १४६ गुन्हे उघडकीस आणले होते. ही मोठी टोळी हातात आल्याने सोनसाखळी चोरीचे गुन्हे कमी होतील, असे चित्र असतानाही शहरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत आहेत. कोथरूड, दत्तवाडी, सांगवी, चिंचवड, पिंपरी आणि विश्रामबाग या ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.
कोथरूड येथील घटनेत अनुराधा अनंत आत्रे (वय ७०) यांचे गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेले होते. ही घटना कोथरूड येथील नवसह्य़ाद्री सोसायटी येथे शनिवारी सायंकाळी घडली. तर, दत्तवाडी येथील घटना शाहू कॉलेज रस्त्यावर शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सुशीला वसंत सुगेवकर (वय ८०) यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ६५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. तर, पिंपळे सौदागर येथील घटनेत मीरा कारान्त यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेले. ही घटना गेल्या महिन्यात घडली होती. कारान्त या कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्या होत्या आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली आहे.
पिंपरी स्मशानभूमीजवळून दर्शना सचिन तामचीकर या पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. तर, विश्रामबाग येथील घटनेत शैला प्रकाश कुलकर्णी (वय ६४, रा. सेनादत्त पेठ) या तेंडुलकर गार्डन येथे पायी जात असाताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून नेली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक यू. व्ही. नामवडे हे अधिक तपास करीत आहेत.