तुमच्या मूळ रकमेवर जादा व्याज दिले जाईल, असे सांगून पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर सह अन्य भागातील व्यापारी आणि नागरिकांची बाप लेकानी तब्बल साडे तीन कोटींची फसवणूक करून, नऊ महिन्यापासून फरार झालेल्या बाप लेकाना पाकिस्तानच्या सीमा रेषेवरून लोणी काळभोर पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.

भरतकुमार चरणदास जोशी वडील, दिपक आणि हिरेन ही मुले अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर नारायण काळभोर हे फिर्यादी आहेत.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भरतकुमार चरणदास जोशी हा व्यापारी असून व्यवसायामुळे लोणी काळभोर, उरुळी कांचन परिसरातील व्यापारी वर्गाशी त्याचे चांगले संबध होते. यातून 1 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतची भिशीची सुरुवात करण्यात आली. या गुंतवणूकीवर सात वर्षाच्या कालावधीनंतर व्याजासह चांगली रक्कम मिळेल, असे आरोपी भरतकुमार चरणदास जोशी याने त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सांगितले. भरतकुमार चरणदास जोशी हा सर्वांच्या सतत संपर्कात असल्याने, गुंतवणूकदारांनी विश्वास ठेवला.

त्याच दरम्यान आरोपीने वेळोवेळी आरटीजीएस आणि रोख रक्कम गुंतवणुकदारांकडून घेण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट 2020 च्या दरम्यान आरोपी भरतकुमार चरणदास जोशी हा दिपक आणि हिरेन या दोन मुलांसह कोट्यावधी रुपये घेऊन पळून गेला. ज्या लोकांनी या बापलेकांकडे गुंतवणूक केली होती. त्या सर्वांनी तिघांना अनेक वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र काही लागत नव्हता. गुंतवणूकदारांनी घरी जाऊन देखील पाहिले. तरी देखील यांचा काही पत्ता लागत नव्हता. अखेर या प्रकरणी ज्ञानेश्वर नारायण काळभोर यांनी तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. आम्ही तिघां आरोपींचा शोध घेत असताना. हे सर्व गुजरात राज्यातील भूज कच्छ येथील पाकिस्तान सीमा रेषा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे तिघांना तेथून अटक केली आहे. सध्या तरी 11 जणांची आणि 3 कोटी 59 लाख 96 हजार 130 रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपींनी आणखी किती जणांची आणि किती कोटींची फसवणूक केली आहे. याबाबत चौकशी सुरू असल्याचे लोणी काळभोर पोलिसांकडून सांगण्यात आले.