सायबर गुन्ह्य़ांवर वचक बसण्याचा पालकमत्र्यांना आशावाद
सायबर गुन्ह्य़ांमध्ये वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी ‘महाराष्ट्र सायबर प्रकल्प’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सायबर लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सायबर गुन्हे करणाऱ्यांवर वचक बसेल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या सायबर लॅबचे उद्घाटन स्वातंत्र्यादिनाचे औचित्य साधून बापट यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बापट प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, शशिकांत शिंदे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पंकज डहाणे, अरविंद चावरीया, कल्पना बारावकर, शेषराव सूर्यवंशी, पी.आर. पाटील, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक लगड, सुनील ताकवले या वेळी उपस्थित होते.
बापट म्हणाले, की सायबर गुन्ह्य़ांची संख्या वाढत आहे तसेच या गुन्ह्य़ांना प्रतिबंध घालण्यासाठी गृहविभागाच्या वतीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सायबर गुन्ह्य़ांचा तपासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांना पकडण्यासाठी राज्यातील विविध पोलीस आयुक्तालये तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. सायबर लॅब सुरू केल्यानंतर करण्यात येणाऱ्या कारवाईचा वार्षिक आढावा घेण्यात येणार आहे. पोलिसांनी जनतेशी संपर्क वाढवायाला हवा. पोलीस जनतेचे मित्र आहेत. तर गुन्हेगारांचे शत्रू आहेत, अशी प्रतिमा पोलिसांनी सामान्यांच्या मनात निर्माण करायला हवी. गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. पोलीस दलासाठी लागणाऱ्या सुविधांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे बापट यांनी सांगितले.