पोलीस कोठडीत रवानगी

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पोलीस कोठडीत चक्कर येऊन कोसळल्यानंतर त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुलकर्णी यांची ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांकडून शुक्रवारी तपासणी करण्यात आली. कुलकर्णी यांची प्रकृती उत्तम असल्याचे तपासणीत आढळून आल्यानंतर कुलकर्णी दाम्पत्याला शुक्रवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी दोघांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णीना दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. कुलकर्णी यांना विशेष न्यायालयाकडून २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, पोलीस कोठडीत कुलकर्णी चक्कर येऊन कोसळले. पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयाने कुलकर्णी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  कुलकर्णी यांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी ससून रुग्णालयातील तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली.

त्यानंतर कुलकर्णी यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.  कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. कुलकर्णी यांच्या योजनांना रिझव्‍‌र्ह बँके ने परवानगी दिलेली नाही. २०१४ ते २०१५ या कालावधीत सहा कंपन्या स्थापन केल्या होत्या. ठेवीदारांनी गुंतवलेला पैसा या कंपन्यांत वळविण्यात आला होता. कुलकर्णी यांनी केलेल्या व्यवहारांची आणि त्यांच्या कंपनीतील भागीदारांची माहिती घ्यायची आहे, त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवादात केली.

या गुन्ह्यत आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे. कुलकर्णी यांनी  थेट मालकांकडून जमिनी खरेदी केलेल्या नाहीत. त्या नातेवाइकांच्या मध्यस्थीने खरेदी केल्या आहेत. यामध्ये कोणकोणते नातेवाईक आहेत, त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी काय केले.  कुलकर्णी दाम्पत्याने बँकांकडून दोन हजार ८९२  कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. कोणकोणत्या बँकांकडून कर्ज काढले आहे, गृहप्रकल्प पूर्ण झाला नसताना त्यांनी हा पैसा कोठे वळविला आहे,  त्यांना एक हजार १५३ कोटी रुपयांचे ठेवीदारांचे देणे आहे. हा पैसा त्यांनी कुठे वळवला,  या बाबतची माहिती घ्यायची आहे. पोलीस कोठडीत हेमंती कुलकर्णी यांनी पोलिसांना जुजबी उत्तरे दिली आहेत. त्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अ‍ॅड. कुलकर्णी यांनी केली.  बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी बाजू मांडली.