डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांना सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. न्यायाधीश आर. आर. भाळगट यांनी हा निर्णय दिला. विनय पवार आणि सारंग अकोलकर या दोघांनी दाभोलकरांचा खून केल्याचे आधी सांगण्यात आले. पानसरेंची हत्याही यांनी केल्याचे सांगण्यात आले. हे दोघेही फरार आहेत, अशात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनी खून केल्याचे सांगितले जाते आहे ते का? असा प्रश्न आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी त्यांच्या युक्तीवादात विचारला.

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ५ वर्षे पूर्ण झाल्याने न्यायालयाच्या दबावातून पोलिसांकडून कारवाई केली जाते आहे का? दाभोलकर हत्या प्रकरणात दोन शूटर्स होते आता चार कुठून आले? या हत्या प्रकरणात अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांचा सहभागही स्पष्ट होत नाही असेही पटवर्धन यांनी न्यायालयात सांगितले. तसेच त्यामुळेच या दोघांना सीबीआय कोठडी देण्याची गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

सीबीआयचे वकील विनयकुमार ढाकणे यांनी हा युक्तीवाद खोडून काढत अमित दिगवेकर हा १५ वर्षांपासून गोव्यातील आश्रमात वास्तव्य करत होता आणि तो विरेंद्र तावडेच्या संपर्कात होता. तसेच राजेश बंगेराने सचिन आणि शरद या दोघांनाही प्रशिक्षण दिले आहे. बंगेरा हा कर्नाटकातील काँग्रेसच्या एका आमदाराचा स्वीय सहाय्यक होता असे म्हणत ढाकणे यांनी आपला युक्तीवाद सादर केला. दोन्ही बाजू ऐकल्यावर सचिन अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा या दोघांना १० दिवसांची सीबीआय कोठडी तर सचिन अंदुरेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.