01 December 2020

News Flash

रविवारची बातमी : तुम्ही व्यवसाय निवडा..

‘देआसरा फाउंडेशन’ची मूळ संकल्पना ही सामान्य माणसाला यशस्वी उद्योजक बनवणे ही आहे

यशासाठी आम्ही साहाय्य करू..
व्यवसायात उतरावे का न उतरावे, व्यवसाय सुरू केलाच तर कोणाची मदत मिळेल अशा द्विधा मन:स्थितीमुळे व्यवसाय चालू करण्याचे धाडस अनेक जण करत नाहीत आणि अशांची संख्याही खूप मोठी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे व्यवसायात मार्गदर्शकाची अर्थात गुरूची उणीव. ही उणीव भरून काढण्याचे काम ‘देआसरा फाउंडेशन’ने सेवेच्या भावनेतून सुरू केले असून उद्यमी युवक, युवतींना हे फाउंडेशन यशाचा मार्ग दाखवण्याचे काम करत आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. व्यवसाय सुरू केल्यानंतरही तो सुरळीत चालविण्यासाठी केवळ भांडवलच नाही तर अनुभव आणि मार्गदर्शनाचीही गरज असते. नेमकी ही गरज ओळखून ‘पर्सस्टिंट सिस्टिम्स’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी ‘देआसरा फाउंडेशन’ या ना नफा तत्त्वावर कार्य करणाऱ्या फाउंडेशनची स्थापना केली आहे. दैनंदिन स्वरूपाच्या शेकडो सेवा नागरिकांना लागतात. अशा सेवा क्षेत्रात स्वत:च्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या तरुणांना आणि नवउद्योजकांना सहकार्य करणारे व्यासपीठ म्हणून हे फाउंडेशन काम करत आहे.
‘देआसरा फाउंडेशन’ची मूळ संकल्पना ही सामान्य माणसाला यशस्वी उद्योजक बनवणे ही आहे. स्वयंरोजगाराची कास धरू इच्छिणाऱ्यांना विविध टप्प्यांवर अनेकविध प्रश्न भेडसावतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘देआसरा फाउंडेशन’ नव्या उद्योजकांच्या बरोबर उभे राहते. व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी सर्व माहिती व योग्य ती मदत ‘देआसरा फाउंडेशन’तर्फे एकाच छताखाली उपलब्ध करून दिली जाते. व्यवसायाच्या क्षेत्रात चाळीसहून अधिक वर्षांचा अनुभव असणारे वरिष्ठ अधिकारी, बँकांमधील उच्चाधिकारी हे ‘देआसरा’मध्ये मार्गदर्शकाचे काम करतात. या मार्गदर्शकांच्या अनुभवाचा फायदा घेऊन विविध क्षेत्रातील अनेक उद्योजकांनी स्वतचे उद्योगही उभारले आहेत.
एखादी व्यक्ती उद्योग करणार म्हणजे नेमके काय करणार, उद्योग कसा करणार आणि त्यातून काय साध्य करायचे आहे, याची स्पष्टता उद्योगाच्या क्षेत्रात जाणाऱ्याकडे असावी लागते. अशी स्पष्टता असेल तर उद्योजकता उद्योजकांसाठी सहजसाध्य ध्येय ठरू शकते. केवळ पदवी असल्याने त्या विषयातील सखोल ज्ञान मिळालेले असतेच असे नाही. तसेच, मनात काही कल्पना आहेत म्हणून उद्योजक बनता येत नाही. तेथे उद्योजकाच्या व्यक्तिमत्त्वाचा, दृष्टिकोनाचा खरा कस लागतो. त्याला त्याच्या मर्यादा, उणिवा कोणत्या आहेत याचा अंदाज येतो. या सर्व बाबींची स्पष्टता असावी लागते, तरच मार्गक्रमण सोपे होऊ शकते. योग्य मार्गदर्शनाने स्वत:मधील क्षमतांचा विकास करणे शक्य असते. तसे केले तर आत्मविश्वासही मिळतो आणि नवउद्योजकाला यश मिळवता येते, हा मुख्य विचार फाउंडेशनने ठेवला असून त्या दृष्टीने नव्याने व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना फाउंडेशनतर्फे सर्व प्रकारचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी केले जाते.

येत्या पाच वर्षांत २५० छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांमधून प्रत्येक प्रकारचे किमान १०० व्यवसाय सुरू करून प्रत्येक व्यवसायात किमान चार जणांना रोजगार मिळवून देणे आणि किमान एक लाख रोजगारांची निर्मिती करणे हे ‘देआसरा’चे उद्दिष्ट आहे. तुम्ही फक्त व्यवसायाची निवड करा आणि आम्ही तो यशस्वी करण्यासाठी साहाय्य करू या संकल्पनेवर फाउंडेशनचे काम सुरू आहे. व्यवसायात नव्याने उतरणाऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यापासून ते अन्य कोणत्याही स्वरूपाचे मार्गदर्शन हवे असेल तर अशांना फाउंडेशनच्या (०२०) ६५३६५३००/११ या क्रमांकावर संपर्क साधता येईल किंवा ‘देआसरा’च्या संपूर्ण संकल्पनेची माहिती www.deasra.in या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 3:14 am

Web Title: deasra foundation pune announces help for achievements in business
Next Stories
1 दत्ता फुगे खूनप्रकरणात नऊ आरोपींना अटक
2 महापौरांचा आदेश, आयुक्तांचा नकार
3 अंतिम पदवी देण्यापूर्वीच पीएच.डी. प्रबंध पाहण्यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक
Just Now!
X