पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहणाऱ्या हर्षद महाडिक या १४ वर्षीय मुलाचा इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. हा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. विश्रांतवाडी पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येतो आहे. मात्र या मृत्यूमागे ब्लू व्हेल गेम तर नाही ना? याचाही शोध पोलीस घेत आहेत. विश्रांतवाडी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद संदीप महाडिक हा शनिवारी त्याच्या घराशेजारी असलेल्या इमारतीच्या ८ व्या मजल्यावर गेला. तिथून त्याने उडी मारली की त्याचा पाय घसरून तो पडला हे अद्याप समजू शकलेले नाही. तो पडल्याचे दिसताच त्याला तातडीने रूग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हर्षद महाडिक हा दिघी येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नववीत शिकत होता. त्याचे वडील सैन्य दलात कार्यरत आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.