८८ वर्षांत एकही तक्रार नसताना ‘डायिनग कार’चे खासगीकरण; प्रवाशांची तीव्र नाराजी

नोकरीच्या निमित्ताने पुणे-मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची लाडकी गाडी असलेल्या डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीमधील डायनिंग कारमधील खाद्यपदार्थाबाबत गेल्या ८८ वर्षांत कोणतीही तक्रार नसताना डायनिंग कारचे खासगीकरण करण्यात आले. एकापेक्षा एक चवदार पदार्थ आणि आपुलकीची सेवा मिळत असतानाही झालेल्या खासगीकरणानंतर मात्र डेक्कन क्वीनमधील खाद्यपदार्थाचा दर्जा खालावल्याने चव सपक झाली आहे. याबाबत प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून, डायनिंग कारची सेवा पुन्हा रेल्वेकडे देण्याची मागणी केली जात आहे.

पुणे-मुंबई प्रवासासाठी १ जून १९३० रोजी डेक्कन क्वीनची सेवा सुरू झाली. आपल्या विविध वैशिष्टय़ांमुळे ही गाडी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. लिम्का बुकमध्ये नोंद झालेली आणि ‘आयएसओ’ हे गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळालेली ही गाडी प्रवाशांची सर्वात लाडकी गाडी आहे. नुकतेच या गाडीने ८८ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. मुंबईत उच्च न्यायालय, मंत्रालयासह खासगी कार्यालयांमध्ये काम करणारी मंडळी या गाडीचे रोजचे प्रवासी आहेत. सकाळी घरी चहा-नाश्ता न करता गाडीतच त्याचा आस्वाद घेणाऱ्यांमुळे प्रवाशांसाठी ही गाडी ‘सेकंड होम’च ठरली.

गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ आणि आपुलकीच्या सेवेमुळे डेक्कन क्वीनमधील खानपान सेवा इतर कोणत्याही गाडय़ांच्या तुलनेत सरसच होती. काही महिन्यांपूर्वीच या गाडीला नवी सुसज्ज डायिनग कारही जोडण्यात आली होती. त्यामुळे खाद्यपदार्थाच्या सेवनाचा आनंद द्विगुणीत झाल्याची भावना प्रवाशी व्यक्त करीत होते. मात्र, त्यातच डेक्कन क्वीनमधील डायनिंग कारच्या खासगीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १ नोव्हेंबरला गाडीतील खानपान सेवा खासगी ठेकेदारामार्फत चालविण्यात येत आहे. खासगीकरण झाल्यानंतर सर्वच खाद्यपदार्थाचा दर्जा घसरला असल्याची तक्रार प्रवाशी करीत आहेत. चवीबरोबरच खाद्यपदार्थ पुरविण्याच्या सेवेचा दर्जाही खालावला असल्याबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या गाडीतील खानपान सेवा पूर्वीप्रमाणेच रेल्वे कर्मचाऱ्यांकडे देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कटलेट, आम्लेट, टोस्ट अन् फिश फ्राय!

डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार रेल्वेकडून चालविण्यात येत असताना विशिष्ट खाद्यपदार्थ लोकप्रिय झाले होते. या खाद्यपदार्थाची आठवण काढल्यास तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नसल्याची भावना प्रवासी व्यक्त करतात. सर्वात लोकप्रिय ठरलेल्या खाद्यपदार्थामध्ये व्हेज कटलेट, चिज टोस्ट, आम्लेट, फिश फ्राय, बिग बीन आदींचा समावेश होता. यासह डेक्कनमधील चहाही प्रचंड लोकप्रिय ठरला. खाद्यपदार्थ तयार करणारे आणि ते वाढणाऱ्या दोघांनाही प्रवाशांची आवड पक्की माहीत होती. प्रवासी डायनिंग कारमधील खुर्चीवर बसला की ऑर्डन न देताच त्याच्या आवडीचा पदार्थ हजर असे. डेक्कन क्वीनमधील खाद्यपदार्थ घरी घेऊन जाणाऱ्यांची संख्याही मोठी होती. कुणाला कधी चहा लागतो, नाश्त्याला कुणाला काय हवे असते, कुठला प्रवासी कोणत्या दिवशी कोणता खाद्यपदार्थ घरी नेतो, याची प्रवाशांच्या नावासह कर्मचाऱ्यांना माहिती होती. खासगीकरणानंतर आपुलकीची सेवा आणि खाद्यपदार्थाची लज्जत दोन्हीही लोप पावल्याचे प्रवाशी सांगतात.

डेक्कन क्वीनच्या संपूर्ण इतिहासात खाद्यपदार्थाबाबत कधीही तक्रार झाली नाही. उलट या गाडीतील खाद्यपदार्थ आणि ती वाढणारी मंडळी प्रवाशांच्या कुटुंबाचाच घटक झाली होती. मात्र, इंडियन रेल्वे केटिरग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या माध्यमातून डायनिंग कार खासगी ठेकेदाराला चालविण्यात देण्यात आली. संबंधित ठेकेदारानेही हे काम दुसऱ्याला दिले. त्यातून खाद्यपदार्थाचा दर्जा घसरला. कारण आणि कोणतीही तक्रार नसताना झालेले हे खासगीकरण निश्चितच निषेधार्ह आहे. खानपान सेवा पूर्वीप्रमाणे रेल्वेकडेच द्यावी, अशी आमची मागणी आहे.

हर्षां शहा, रेल्वे प्रवाशी ग्रुप अध्यक्षा