बोपखेल ते ‘५१२ खडकी’ ला जोडणारा तात्पुरता तरंगता पूल बंद करण्याचा लष्कराने घेतलेला निर्णय गुरूवारी तूर्त मागे घेतला. भाजप खासदार अमर साबळे यांनी येथील परिस्थिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तो तरंगता पूल काढू नये, असे आदेश त्यांनी दिले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार लष्कराने दापोडी-बोपखेल रस्ता बंद केला. त्यानंतर पर्याय असलेला बोपखेल-खडकीला जोडणारा तरंगता पूलही काढून घेण्यात येणार असल्याने या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार होती. दिघी भोसरीमार्ग १६ किलोमीटरचा तर विश्रांतवाडी, संगमवाडीमार्गे १२ किलोमीटरचा वळसा पडणार होता. स्थानिक नगरसेवक संजय काटे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव, आयुक्त राजीव जाधव यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांना ही परिस्थिती सांगितली. त्यानुसार, अधिवेशनासाठी दिल्लीत असलेल्या साबळे यांनी तातडीने पर्रिकरांची भेट घेतली. येथील परिस्थिती विशद करून हा तरंगता पूल काढून घेऊ नये, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. त्यानंतर, ग्रामस्थांची तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, या हेतूने पर्रिकरांनी पूल काढून घेऊ नका, असे आदेश लष्करी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे बोपखेलवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.