ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे ४ एप्रिल रोजी उद्योजकांचे शिष्टमंडळ गुंतवणुकीसाठी इथिओपियाला रवाना होत आहे.
माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी आफ्रिका खंडातील देशाला कृषी शिष्टमंडळ गेले होते. राजधानी आदिस अबाबा, अदामा आणि हबासा या शहरांना भेट देऊन तेथील चेंबर ऑफ कॉमर्सबरोबर तीन सामंजस्य करार करण्यात आले होते. इथिओपियन सरकारच्या कृषी आर्थिक गुंतवणूक, विद्युतनिर्मिती आणि वितरण, पर्यटन या विभागांच्या कार्यालयांना भेट देण्यात आली होती. या देशामध्ये राजकीय स्थैर्य असल्याने आणि गुंतवणूक पूर्णत: सुरक्षित असल्याने दुसऱ्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रान्स एशियन चेंबरचे संस्थापक-मानद सचिव संजय भिडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. अकरा दिवसांच्या या दौऱ्यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांनी अधिक माहितीसाठी ९८२०९६६४६८७ किंवा ८६५२०२००८८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन भिडे यांनी केले आहे.