News Flash

पीओएस यंत्रांविना ‘कॅशलेस’ व्हायचे कसे..?

चलन तुटवडय़ावर मात करण्यासाठी छोटय़ा व्यावसायिकांनी ‘पीओएस’ यंत्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

यंत्रांचा पुरवठा मागणीच्या फक्त एक टक्काच; मागणी करूनही यंत्रे मिळत नसल्याची व्यावसायिकांची तक्रार

नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांसाठी व्यावसायिकांकडून ‘पॉइंट ऑफ सेल’ (पीओएस) यंत्राच्या मागणीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, या यंत्रांचा तीव्र तुटवडा असल्याने व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक महिन्यापासून बँकांकडे पीओएस यंत्रांची मागणी करूनही ती यंत्र व्यावसायिकांना मिळत नसल्याने त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. मागणीच्या तुलनेत साधारण १ ते २ टक्केच यंत्रे सध्या उपलब्ध होत असल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एकीकडे रोकडविरहित व्यवहाराचे धडे नागरिकांना दिले जात आहेत. त्याचा प्रचारही मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. मात्र त्याचवेळी पीओएस यंत्रांचा तुडवडा, पेटीएमसारख्या अ‍ॅपना असणाऱ्या मर्यादा यामुळे त्यातही अडचणी; अशा परिस्थितीत ‘कॅशलेस व्हावेसे वाटले तरीही कॅशलेस व्हायचे कसे?’ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बँकांकडे पीओएस यंत्रांची मागणी करूनही ती मिळत नसल्यामुळे व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

व्यावसायिकांना बँकांकडून पीओएस यंत्रांचा पुरवठा अत्यल्प

* चलन तुटवडय़ावर मात करण्यासाठी छोटय़ा व्यावसायिकांनी ‘पीओएस’ यंत्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ज्या बॅँकेत खाते आहे, त्या बँकांकडे पीओएस यंत्राची मागणी व्यावसायिकांकडून नोंदवली जाते. या यंत्रासाठी महिन्याला सहाशे ते दीड हजार रुपये भाडे घेऊन बॅँका व्यावसायिकांना पीओएस यंत्र पुरवतात. मात्र, महिन्यापूर्वी मागणी करुनही अनेक व्यावसायिकांना बँकांकडून अद्यापही पीओएस मशिन देण्यात आलेले नाही. यंत्रांचे उत्पादनच कमी होत असल्यामुळे मागणीच्या तुलनेत एक ते दोन टक्केच पुरवठा होत असल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

* गेल्या महिन्याभरात पीओएस मशिन्सची मागणी खूप वाढली आहे. १७ ते २० हजार यंत्रांची मागणी आहे. प्रत्यक्षात २०० ते ३०० यंत्रांचाच पुरवठा होऊ शकला. यंत्र तयार करणाऱ्या कंपन्यांकडून आम्हालाच ही यंत्रे उपलब्ध होत नसल्यामुळे आम्ही ती ग्राहकांना देऊ शकलेलो नाही असे सांगण्यात आल्याची माहिती आयडीबीआय बँकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

यंत्रांविना व्यवहार

ग्राहकांकडे पैसे नसल्यामुळे अनेक जण डेबिट कार्ड घेऊन येतात. अनेकदा यंत्र नसल्यामुळे केलेली खरेदी रद्द करण्याची वेळ ग्राहकांवर येते. यंत्र लवकरच मिळेल असे आश्वासन विविध बँकांमधील अधिकाऱ्यांकडून व्यावसायिकांना देण्यात येत आहे. प्रत्यक्षात एक महिन्यानंतरही यंत्र मिळालेले नाही. त्यामुळे कॅशलेस व्यवहारात बाधा येते, असे व्यावसायिकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 3:58 am

Web Title: demand for card swipe machines increased
Next Stories
1 राजकीय कार्यक्रमांवर उधळपट्टी
2 पहिल्या ‘सेल्फी डे’ला शिक्षकांचीच सुट्टी!
3 ‘एमबीबीएस’ डॉक्टरांना आयुर्वेदातील  पदव्युत्तर पदवीला थेट प्रवेश
Just Now!
X