‘महावितरण’मधील लाचखोर अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘महावितरण’च्या रास्ता पेठ कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईची दखल घेऊन अजित पवार यांनी ‘महावितरण’ मधील भ्रष्ट कारारावर ‘प्रकाश’ टाकावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
आमदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राजेश येनपुरे, दिलीप काळोखे, रामदेव माळवदे, युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी झालेल्या सभेत बापट म्हणाले की, सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या भ्रष्ट अभियंत्यांच्या विरोधात आमचे आंदोलन आहे. एकीकडे सामान्य नागरिकांची अनेक खेपा घालूनही कामे पूर्ण होत नाहीत, तर दुसरीकडे पैशांच्या लोभापोटी काही अधिकारी गैरप्रकार करताना आढळून येत आहेत. या घटनेचे गांभीर्य लाक्षात घेऊन आघाडी सरकारने तातडीने संबंधित अभियंत्यांवर कारवाई करावी.