डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत सर्वाधिक महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक महत्त्वाची महाविद्यालये आणि महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांचा यामध्ये समावेश आहे.

डेंग्यूच्या डासांची पैदास साठून राहिलेल्या पाण्यात, वातानुकूलित यंत्रांमध्ये तसेच अडगळीमध्ये होते. त्याचाच परिणाम म्हणून पावसाळ्याच्या तोंडावर आणि पावसाळा सुरू होताच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी केली जाते. या तपासणीत सार्वजनिक मालमत्ता, कार्यालये, गृह निर्माण संस्था यांची तपासणी करून डेंग्यू डासांची उत्पत्ती स्थळे शोधून ती नष्ट केली जातात आणि त्या ठिकाणी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत योग्य समज दिली जाते.

महापालिकेच्या सहायक डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, शहरातील २० महत्त्वाची महाविद्यालये आणि २० सरकारी कार्यालये यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्या त्या ठिकाणची डेंग्यू डासांची उत्पत्ती स्थळे तेथील प्रशासनाला दाखवून औषध फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर काय खबरदारी घ्यावी याविषयीच्या सूचना देऊन कार्यवाही करण्याचे पत्र संस्था व कार्यालयांना देण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या उपाययोजना  पत्राद्वारे महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळवण्याविषयी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

नामवंत शाळा, महाविद्यालयांचा समावेश

शहरात आढळलेल्या डेंग्यूग्रस्त रुग्णांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी शहरातील नामवंत समजल्या जाणाऱ्या मुक्तांगण हायस्कूल, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, सेंट मीरा हायस्कूल तसेच विमानतळ रस्त्यावरील सिम्बायोसिस महाविद्यालयांचा डेंग्यू डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या ठिकाणांमध्ये समावेश असल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आले. सरकारी कार्यालयांमध्ये देखील डेंग्यूची उत्पत्तीस्थळे आढळली असून त्यामध्ये पोलिस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालय, अन्य पोलिस ठाणी अशा महत्त्वाच्या कार्यालयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.