नायडू आणि कमला नेहरू रुग्णालयात डेंग्यूच्या चाचण्या सुरू करण्याचा राज्याचा प्रस्ताव आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयांमध्ये डेंग्यू चाचण्यांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधाच नाहीत. या सुविधा उपलब्ध करण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून पालिकेकडे पाठपुरावा करत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
डेंग्यूच्या चाचण्या करण्यासाठी राज्यात २६ ठिकाणी शासकीय केंद्रे (सेंटिनेल सव्र्हेलन्स सेंटर) चालवली जातात. ही यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे आणखी ९ ठिकाणी डेंग्यू चाचणी केंद्रे सुरू केली जावीत, असा आरोग्य विभागाचा प्रस्ताव आहे. काही जिल्हा रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांचा यात समावेश असून पुण्यात औंधचे जिल्हा रुग्णालय, पालिकेतर्फे चालवले जाणारे संसर्गजन्य रोगांचे नायडू रुग्णालय तसेच कमला नेहरू रुग्णालय या तीन रुग्णालयांची सेंटिनेल सव्र्हेलन्स केंद्रांसाठी वर्णी लागली आहे. आरोग्य विभागाच्या सहसंचालक (साथरोग) डॉ. कांचन जगताप यांनी ही माहिती दिली.
सध्या ससून आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) या दोन शासकीय केंद्रात डेंग्यूची चाचणी होते. दर वर्षी डेंग्यूची साथ सुरू झाल्यावर या दोन्ही ठिकाणी दररोज मोठय़ा प्रमाणावर रक्तनमुने तपासणीची गर्दी होते. डेंग्यूच्या चाचण्यांसाठी ‘एलायझा रीडर’ आणि ‘वॉशर’ ही उपकरणे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ गरजेचे असतात. औंध रुग्णालयात ही उपकरणे उपलब्ध आहेत. त्यांचा वापर सध्या केवळ रक्तपेढीसाठी केला जातो, परंतु हीच उपकरणे डेंग्यू चाचण्यांसाठी वापरता येणार असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मात्र पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाण्यावरच चाचण्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. डॉ. जगताप म्हणाल्या, ‘पालिकेने या दोन रुग्णालयांच्या प्रयोगशाळेत या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी आम्ही पालिकेकडे याबद्दल बराच काळ पाठपुरावा करतो आहोत. सुविधा उपलब्ध झाल्यावर राज्याकडून पुढील कार्यवाही तत्काळ केली जाईल.’
नायडू रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. फ्रान्सिस बेनेडिक्ट म्हणाले, ‘सध्या आमच्याकडे एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ असून केवळ ‘रुटीन’ चाचण्या केल्या जातात. उपकरणे वाढवल्यास अधिक मनुष्यबळाचीही गरज भासेल.’

‘या महिन्यात नायडू आणि कमला नेहरू या दोनही ठिकाणी ‘एलायझा रीडर आणि वॉशर’ उपलब्ध करून दिला जाईल. या उपकरणाची किंमत तीन ते साडेतीन लाख आहे. या उपकरणांची खरेदी आरोग्य विभागाच्याच अधिकारात असून ती जूनअखेरीस केली जाईल’

– आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी