सोळा बोलींचे द्विभाषिक वाचन साहित्य मुलांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

प्रमाण भाषा आणि बोली भाषा यामध्ये असलेले कमालीचे अंतर आपल्या शिक्षणव्यवस्थेने ध्यानातच घेतलेले नाही. त्यामुळे आदिवासी बोली ही मातृभाषा असलेल्या मुलांसाठी प्रमाण भाषा ही एखाद्या परकीय भाषेप्रमाणेच वाटते. ही बाब ध्यानात घेऊन या मुलांची शिक्षण प्रक्रिया सुलभ आणि सुकर व्हावी या उद्देशातून आदिवासी बोलींच्या पुस्तक निर्मितीचे शिवधनुष्य पेलण्याचा संकल्प पुण्यातील वर्षां सहस्त्रबुद्धे यांनी केला आहे. विविध सोळा बोलींमध्ये वाचन साहित्य निर्माण करून ते मुलांच्या दप्तरातून त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा निर्धार आहे.

शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीने गावागावातील मुले शाळेपर्यंत पोहोचली खरी, पण यातील अनेक मुलांच्या घरी बोलल्या जाणाऱ्या भाषांची दखल आपण घेतलेली नाही. या मुलांसाठी मराठी ही एक परभाषाच आहे. मराठी माध्यमातून त्यांनी शिक्षण घ्यावे आणि कठीण संकल्पना आत्मसात कराव्यात अशी अपेक्षा केली जाते. मुलांचा आत्मसन्मान जपत हे भाषिक आणि शैक्षणिक आव्हान पेलण्यासाठी मुलांचे अनुभवविश्व प्रतििबबित होते अशा द्विभाषिक वाचन साहित्याची निर्मिती या वाटेने जाण्याचे ठरविले असल्याचे वर्षां सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. अक्षरनंदन शाळेच्या संस्थापक मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी दहा वर्षे काम केले. तेथून बाहेर पडून शिक्षण क्षेत्रातील अडचणी समजून घेत त्याच्या निराकरणासाठी सध्या त्या काम करीत आहेत.

अक्षरनंदन शाळेत असताना मी बालभारतीमध्ये पाठय़पुस्तकांच्या निर्मितीसाठी योगदान दिले. आंध्र प्रदेशच्या सीमेवरील कोरपना (जि. चंद्रपूर) येथील शाळेला भेट दिल्यानंतर बोली भाषा आणि प्रमाण भाषा यातील तफावत ध्यानात आली, असे सांगून सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, त्या वर्गामध्ये बंजारा, कोलामी आणि गोंड अशा तीन मातृबोली बोलणाऱ्या मुलांना प्रमाण मराठी भाषेतील पुस्तक समजत नाही हे लक्षात आले. दोन विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषिक देवाणघेवाण होत नव्हती. आपले अनुभवविश्व प्रतििबबित झालेले वाचन करण्यामध्ये मुलांना आनंद असतो. शिक्षणाची ही सहज प्रक्रिया घडून येत नसल्याने स्थानिक शिक्षकांची मदत घेऊन काही पुस्तिका तयार केल्या.

लोकसहभागातून निधी उभारण्याचा मानस

साक्षरता प्रमाणामध्ये आदिवासी जिल्ह्य़ांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. हे ध्यानात विविध १६ बोलींमध्ये द्विभाषिक वाचन साहित्याची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘मूलगामी प्रकाशन’ ही संस्था स्थापन केली आहे. एका बोलीतील दहा पुस्तकांच्या एक हजार प्रतींच्या आवृत्तीचा खर्च सुमारे सव्वालाख रुपये असल्यामुळे या प्रकल्पासाठी लोकसहभागातून निधी उभारण्याचा मानस आहे. आदिवासी मुलाच्या दप्तरातून ही पुस्तके पोहोचावीत हा प्रयत्न असल्याचे वर्षां सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.