परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री पदी विराजमान झालेल्या धनंजय मुंडे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या बीड, परळीतील नागरिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पुण्यात वास्तव्याला असणाऱ्या बीडकरांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी केली. धनंजय मुंडे आले. पण, पंचाईत त्यानंतर झाली. जात असताना धनंजय मुंडे यांना सेल्फीसाठी गराडा पडला. इतका की, त्यांना वैतागून एका-एका माणसाला बाजूला करत गर्दीतून वाट काढावी लागली.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यात वास्तव्याला असलेल्या परळी मतदारसंघातील मतदारांचा आभार मेळावा आयोजित केला होता. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सपत्नीक उपस्थिती लावली. ते पुण्यातून काही कार्यक्रम करून रावेत येथील मेळाव्याला सायंकाळी हजर राहिले. फटाके आणि तुतारीच्या निनादात विशेष स्वागत करण्यात आले. ते आल्यापासूनच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. सर्व जण व्यासपीठाच्या समोरील बाजूस उभे होते. अनेकदा माईकवर व्यासपीठासमोरील कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये कोणी नव्हते. प्रत्येक कार्यकर्ता, महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण व्यासपीठावर जाऊन धनंजय मुंडे यांच्या सोबत फोटो सेल्फी घेत होते.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे भाषण झाल्यानंतर धंनजय मुंडे यांनी संवाद साधला. त्यांनी आपल्या भाषणात कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या या भाषणावर टाळ्या शिट्ट्या पडल्या. दरम्यान, भाषण संपल्यानंतर अंगरक्षकांना बाजूला करून शेकडो कार्यकर्ते मुंडे यांच्या दिशेने आले. धनंजय मुंडे यांना देण्यासाठी आणलेले पुष्पगुच्छ, हार देत सेल्फी फोटो काढण्यासाठी अक्षरशः स्पर्धा कार्यकर्त्यांमध्ये लागली होती. तेव्हा धनंजय मुंडे यांनी एका-एका कार्यकर्त्याला हाताने पुढे ढकलत बाजूला केले. कार्यकर्त्यांना बाजूला होण्याचे अनेकदा माईकवरून सांगण्यात आले. हा सर्व प्रकार अर्धा तास सुरू होता अन् धनंजय मुंडे त्रासून गेले.