‘राजकीय नेते दिवसभर समाजकार्यच करत असल्याचे सांगतात. मग हे समाजकार्य करत असताना त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी जमा होते,’ अशी टीका विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी रविवारी केली.
धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आदर्श कार्यकर्ता पुरस्कार सोहळ्यात निंबाळकर बोलत होते. या वेळी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर आबा बागुल, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, चंद्रकांत छाजेड, रामदास फुटाणे, अंकुश काकडे, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, धनंजय थोरात यांच्या पत्नी शुभांगी थोरात, चंद्रशेखर कपोते आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा दांडेकर, आनंद सराफ, शिल्पकार प्रमोद कांबळे यांना या वर्षीचे पुरस्कार देण्यात आले. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे.
या वेळी निंबाळकर म्हणाले, ‘संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती हेच समीकरण दृढ होत चालले आहे. मात्र, नि:स्वार्थीपणे काम करणारे कार्यकर्तेच समाजाला पुढे नेत असतात. आपली लोकशाही अशा कार्यकर्त्यांमुळे टिकून आहे. थोरात यांच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते तयार होण्याची आवश्यकता आहे.’ ‘थोरात हे असामान्य कार्यकर्ते होते. आयुष्यभर दुसऱ्याला काय देता येईल, याचाच विचार त्यांनी केला,’ असे मत देव यांनी व्यक्त केले.