जगभरातील वाचकांना पुस्तके वाचनाची सुविधा

इतिहास, वेद, महाभारत-रामायण, हिंदू-बौद्ध आणि जैन धर्म, पुरातत्त्वशास्त्र, प्राचीन इतिहास, भारतीय शास्त्रे, कला, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवरील संस्कृत, प्राकृत, पाली या भाषांतील एक हजार पुस्तकांचा मौलिक खजिना भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर खुला होत आहे. विविध विषयातील ज्ञानशाखांचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या जगभरातील वाचकांना संगणकाची एक कळ दाबताच या पुस्तकांचे वाचन करता येणार आहे. मात्र, ही पुस्तके डाऊनलोड करता येणार नाहीत.

शताब्दीवर्षांच्यानिमित्ताने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘ई-लायब्ररी’ प्रकल्पाला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. नियमित वापरामुळे अगदी जीर्ण झालेली आणि दुर्मीळ अशी एक हजार पुस्तके संस्थेच्या संकेतस्थळावरील ‘ई-लायब्ररी’मध्ये ठेवण्यात आली आहेत. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते बुधवारी (१९ डिसेंबर) संस्थेच्या ई-लायब्ररीचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी दिली.

भांडारकर संस्था आणि डायमंड पब्लिकेशन्सतर्फे भरविण्यात येणाऱ्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते बुधवारी सकाळी दहा वाजता होणार असून महापौर मुक्ता टिळक या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘वेरूळ-एक अद्भुत शिल्प’ या विषयावर देगलूरकर यांचे व्याख्यान होणार आहे.

संस्थेच्या टाटा सभागृहामध्ये २६ डिसेंबपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे, असे संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि डायमंड पब्लिकेशन्सचे दत्तात्रय पाष्टे यांनी सांगितले.

पुस्तक प्रदर्शनानिमित्त ‘मुलाखतकाराची मुलाखत’ हा कार्यक्रम होईल. त्यात सुधीर गाडगीळ यांची २१ डिसेंबर रोजी मुलाखत होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल २६ डिसेंबर रोजी डॉ. अरुणा ढेरे यांचा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असून ढेरे यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.