भांडारकर प्रााच्यविद्या संशोधन संस्थेच्या ग्रंथालयातील पुस्तकांची संगणकीकृत सूची करण्याचा प्रकल्प सुरू झाला असून त्यासाठी पर्सिस्टंट फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे. ग्रंथालयातील पुस्तकांचे डिजिटलायझेशन करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हा पहिला टप्पा कार्यान्वित झाला असून भविष्यात प्राच्यविद्या संशोधकांना संगणकाच्या एका क्लिकवर संस्थेतील ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.
प्राच्यविद्या संशोधनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या आणि शताब्दीकडे वाटचाल करीत असलेल्या भांडारकर संस्थेच्या ग्रंथालयामध्ये सव्वालाख पुस्तकांचा ठेवा आहे. यातील काही पुस्तके जीर्ण झाली असून काही पुस्तके हाताळतादेखील येत नाहीत अशा अवस्थेमध्ये आहेत. त्यामुळे ही ग्रंथसंपदा डिजिटलायझेशनच्या माध्यमातून जतन करणे गरजेचे झाले आहे. त्याची पहिली पायरी म्हणून या पुस्तकांची संगणकीकृत नोंद करून ही सूची करण्याचा प्रकल्प संस्थेने हाती घेतला आहे. या नोंदीबरोबरच काही दुर्मिळ पुस्तकांमधील महत्त्वाच्या पानांचेही डिजिटलायझेशनच्या माध्यमातून जतन करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्सिस्टंट फाउंडेशनचे प्रमुख दादा देशपांडे यांनी साहाय्य देऊ केले आहे, अशी माहिती संस्थेच्या मानद सचिव डॉ. मैत्रेयी देशपांडे यांनी दिली.
पर्सिस्टंट फाउंडेशनचे दादा देशपांडे यांनी संस्थेशी संपर्क साधून या प्रकल्पामध्ये योगदान देण्याची इच्छा प्रदर्शित केली. फाउंडेशनच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अर्थसाह्य़ व्हावे या उद्देशातून ५० मुलांना प्रशिक्षण दिले आहे. त्यातील काही मुले या प्रकल्पामध्ये सकाळी आठ ते रात्री आठ या वेळात काम करीत आहेत. प्रत्येक पुस्तकाचे आणि लेखकाचे नाव, भाषा, पुस्तकाचे मुखपृष्ठ, त्यातील आशय, पुस्तक विकत घेतले की देणगी मिळालेले आहे, अशी सर्व माहिती पीडीएफ फाईलमध्ये जतन करीत एका पुस्तकाच्या संगणकीय नोंदीसाठी संस्था संबंधित विद्यार्थ्यांला एक रुपया देणार आहे. या विद्यार्थ्यांना फाउंडेशनतर्फे मानधन दिले जाणार आहे. केवळ या प्रकल्पासाठी फाउंडेशनने पाच लॅपटॉप संस्थेला देऊ केले आहेत. संगणकीकृत नोंद झाल्यानंतर त्याची पीडीएफ फाईल करणे आणि अन्य अनुषांगिक बाबींसाठी संस्थेला एका पुस्तकामागे पाच रुपये खर्च येणार आहे. संगणकीकृत नोंदी करण्याच्या प्रकल्पामुळे संस्थेच्या संग्रहातील एकूण पुस्तकांच्या नोंदी अद्ययावत करण्याबरोबरच एकूण ग्रंथसंपदेचाही यानिमित्ताने पडताळा करणे शक्य होणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

असा आहे प्रकल्प
– भांडारकर संस्थेच्या संग्रहामध्ये सव्वा लाख पुस्तकांचा ठेवा
– सर रामचंद्र गोपाळ भांडारकर यांनी संस्थेला देणगी दिलेल्या ‘भांडारकर कलेक्शन’मधील अडीच हजार ग्रंथांचा अंतर्भाव
– ग्रंथांच्या संगणकीय नोंदीसाठी पर्सिस्टंट फाउंडेशनचा मदतीचा हात
– फाउंडेशनच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थी करणार नोंदी
– भांडारकर संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तकामागे एक रुपया मोबदला
– भविष्यातील ग्रंथसंपदेच्या डिजिटलायझेशनची पहिली पायरी