भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांची लाखोंची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सोसायटीच्या संचालकासह बारा जाणांस पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या सोसायटीच्या संचालकांवर पुण्यात कोथरूड, भारती विद्यापीठ, डेक्कन, निगडी पोलीस ठाण्यात देखील लाखोंच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या सर्व आरोपींवर कोथरूड पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम १९९९ अनुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्रमोद भाईचंद रायसोनी (वय ५४, रा. बळीराम पेठ, जळगाव), दिलीप कांतीलाल चोरडिया (वय ५१), मोतीलाल ओंकार जीरी (वय ४६), सूरजमल बभुतमल जैन (वय ५०), दादा रामचंद्र पाटील (वय ६७), भागवत संपत माळी (वय ६३), राजाराम काशिनाथ कोळी (वय ४७), भगवान हिरामण वाघ (वय ६०), शेख रमजान शेख अब्दुल नवी मन्यार (वय ५५, रा. सर्व जण-तळेगाव, ता. जामनेर जळगाव), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (वय ५२, रा. मेहेंदळेनगर जळगाव), इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (वय ४०, रा. महाबळ, जळगांव) आणि सुकलाल शहादु माळी (वय ४५, रा. नवीन भगवाननगर, जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मुकुंद काशिनाथ बडवे (वय ६३, रा. रामबाग कॉलनी, पौड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. या सर्वाना जळगाव पोलिसांनी अटक केली होती. त्यांना जळगाव कारागृहातून वर्ग करून घेत कोथरूडच्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मूळ शाखा जळगाव येथे असून त्याच्या पुण्यातील कोथरूड, भारती विद्यापीठ परिसरात शाखा आहेत. कोथरूड भागातील आठ ठेवीदारांची मुदतठेव स्वरूपात ठेवलेली रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बारा आरोपींना अटक करून मंगळवारी चारच्या सुमारास न्यायालयात हजर केले. सरकारी वकिलांनी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोसायटीच्या दोन शाखा असून त्यामध्ये ४० लाख रुपयांची ठेवीदारांची फसवणूक केली. त्यांनी ही रक्कम नातेवाईक किंवा मित्रांना कर्जरूपाने दिली आहे का, सोसायटीच्या कोथरूड येथील दोन शाखा बंद आहेत. पुराव्याचे कागदपत्रे कोठे ठेवले आहेत याचा तपास करायचा आहे. सोसायटीत गुंतवणूक करणारे सर्व ठेवीदार हे सेवानिवृत्त असून त्यांच्या उपजीविकेची रक्कम हडप करून आरोपींनी त्यांचा विश्वासघात केला आहे. या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य़ धरीत न्यायालयाने आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.