किराणा, भुसार मालाला उठाव कमी

पुणे : गौरी-गणपतीत राज्यभरातील भुसार बाजारात मोठी उलाढाल होते. किराणा आणि भुसार मालाची मागणी आणि खरेदीतही वाढ होते. यंदाच्या वर्षी उत्सवावर करोनाचे सावट तसेच आर्थिक चणचणीमुळे भुसार बाजारात निरुत्साहाचे वातावरण आहे. खरेदीसाठी फारशी गर्दी होत नसल्याचे चित्र सध्या भुसार बाजारात पाहायला मिळत असून दरवर्षीच्या तुलनेत गौरी-गणपतीत भुसार मालाला असणाऱ्या मागणीत घट झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा असलेल्या मार्केटयार्डातील भुसार बाजारात सध्या निरूत्साहाचे वातावरण आहे. भुसार मालाची आवक मुबलक होत असली तरी भुसार मालाला मागणी कमी आहे. दरवर्षी गौरी-गणपतीच्या सणासाठी डाळी, बेसन पीठ, तेल, शेंगदाणे, पोहे, रवा, साखर, पिठीसाखर, गूळ अशा जिन्नसांना मोठी मागणी असते. यंदाच्या वर्षी अन्नधान्याला मागणी कमी असल्याचे निरीक्षण मार्केटयार्डातील भुसार व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी नोंदविले.

श्रावण, गौरी-गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळीत भुसार मालाच्या मागणीत मोठी वाढ होते. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापासून करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर भुसार बाजारातील व्यवहारांवर परिणाम झाला. खासगी उद्योग, व्यवसाय, कार्यालये बंद ठेवण्यात आली. त्यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागले. या सर्व बाबींचा परिणाम गौरी-गणपतीतील  खरेदीवर जाणवत आहे. दरवर्षी गौरी-गणपतीत भुसार बाजारात उत्साहाचे वातावरण असते. घाऊक खरेदीदार तसेच किरकोळ किराणा माल विक्रेत्यांची खरेदीसाठी गर्दी होत असते. यंदा मात्र, बाजारात निरूत्साहाचे वातावरण आहे. गौरी-गणपतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच खरेदीदारांची फारशी गर्दी होत नसल्याचे चित्र सध्या  बाजारात पाहायला मिळत आहे.

साखर, पिठीसाखरेला मागणी कमी

गौरी-गणपतीत किराणा आणि भुसार मालाला मोठी मागणी असते. यंदाच्या वर्षी किराणा आणि भुसार बाजारात निरूत्साहाचे वातावरण आहे. खासगी कार्यालये आणि उद्योग अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचारी घरातून काम करत आहेत. उद्योग, खासगी कार्यालयातील उपाहारगृहे (कॅन्टीन) तसेच शहरातील  उपाहारगृहे (हॉटेल्स) अद्याप सुरू झाली नाहीत. गौरी-गणपतीत साखर, पिठीसाखरेला मोठी मागणी असते. एसटी सेवा, रेल्वे सेवा बंद आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट झाली आहे. यंदाच्या वर्षी गौरी-गणपतीत किराणा आणि भुसार मालाला असणारी मागणी पन्नास टक्क्य़ांहून कमी झाली आहे, असे भवानी पेठ भुसार बाजारातील व्यापारी विजय गुजराती यांनी नमूद केले.