आघारकर संस्थेतील शास्त्रज्ञांचे संशोधन

पुणे : समृद्ध जैवविविधता असलेल्या आंबोलीमध्ये गवताच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पावसाळी ओढ्यांमध्ये आणि आंबोली गावातील भातखाचरांमध्ये ही प्रजाती आढळून आली असून, या प्रजातीचे ‘इस्चिमम आंबोलीएन्स’ असे नामकरण करण्यात आले आहे.

आघारकर संशोधन संस्थेतील डॉ. मंदार दातार, डॉ. शुभदा ताम्हनकर, डॉ. रितेश कुमार चौधरी आणि सारंग बोकील यांचा या संशोधनात सहभाग आहे. या संशोधनाचा शोधनिबंध ‘फायटोटॅक्सा’ या संशोधन पत्रिके मध्ये प्रसिद्ध झाला आहे. ‘इस्चिमम’ या गवताच्या प्रकाराच्या जगभरात ८१ जाती आढळतात. त्यापैकी ६१ जाती देशभरातील विविध भागात दिसून येतात. त्यातील बहुतांश प्रजाती प्रदेशनिष्ठ असून त्या सह््याद्री डोंगररांगांमध्येच आढळतात.

संशोधनाविषयी डॉ. दातार म्हणाले, की  इस्चिमम प्रजातीसंदर्भातील संशोधन २०१७ पासून सुरू होते. या संशोधनासाठी देशभर सर्वेक्षण करून इस्चिमम प्रजातीच्या गवताचे सुमारे साडेतीनशेहून अधिक नमुने गोळा केले. त्यानंतर डीएनएवर आधारित वंशावळींचा सविस्तर अभ्यास केला. जगभरात डीएनएच्या वंशावळीवरून या वनस्पती प्रजातीचा अभ्यास पहिल्यांदाच होत आहे.

वनस्पतीला प्रथमच आंबोलीचे नाव

काही वनस्पतींचा शोध आंबोली परिसरातून लागला असला, तरी पहिल्यांदाच वनस्पतीला आंबोलीचे नाव देण्यात आले आहे. गवताच्या नव्या प्रजातीचे नामकरण ‘इस्चिमम आंबोलीएन्स’ करण्यात आले आहे.  जगभरातील अभ्यासकांना या स्थानाची माहिती व्हावी म्हणून या गवताला आंबोलीचे नाव देण्यात आल्याचे डॉ. दातार यांनी नमूद  केले.