मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
जाणते अजाणतेपणे झालेल्या चुकांमुळे एखाद्याची पावले गुन्हेगारीकडे वळतात. त्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी त्याची रवानगी कारागृहात होते. सुधारणा व पुनर्वसन असे ब्रीद घेऊन कारागृह प्रशासनाने कैद्यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षांपासून कैद्यांच्या मुलांसाठी शिक्षण सेवा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत बालवाडीपासून महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात येणार आहेत.
राज्य कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरराव भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई आणि आदर्श मंडळाचे उदय जगताप यांनी या उपक्रमास सहाय्य केले आहे. या उपक्रमाविषयी माहिती देताना डॉ.भोई आणि जगताप म्हणाले की, येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अनेक कैद्यांच्या मुलांना शिक्षणात गती आहे. वडील कारागृहात असल्यामुळे समाजदेखील त्यांच्याकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून बघतो. गुन्हेगारांची मुले गुन्हेगार होणार असे टोमणेदेखील मारले जातात. परंतु अनेक कैद्यांची मुले अभ्यासात हुशार आहेत. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षण सेवा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मुलांना वह्य़ा, पुस्तके आणि दफ्तरांचे वाटप करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात सव्वादोनशे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
ज्या कैद्यांची मुले शिक्षण घेत आहेत अशांची यादी तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढली तरी कारागृह प्रमुख उपाध्याय यांनी या उपक्रमास सहाय्य करण्याची तयारी दर्शविली आहे. कारागृहाचे अधीक्षक यू.टी. पवार या उपक्रमाचे संयोजक आहेत. या उपक्रमास विविध संस्था, सार्वजनिक मंडळांनी सहाय्य करावे, असे आवाहन डॉ. भोई आणि जगताप यांनी केले आहे.
कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रेरणापथ हा उपक्रम कारागृहात राबविण्यास सुरुवात झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान कारागृहात आयोजित करण्यात येते, असे त्यांनी नमूद के ले.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य
पहिल्या टप्यात कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. जी मुले सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवितात. अशा विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. सुरुवातीला पंचवीस टक्के रक्कम शिष्यवृत्तीपोटी देण्यात येणार आहे. टप्याटप्याने ही रक्कम वाढविण्यात येईल. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या अनेक घरांतील मुलांना शैक्षणिक गती आहे. अडचणींना सामोरे जात अनेक विद्यार्थ्यांनी नैपुण्य मिळविले. अशा विद्यार्थ्यांंना मदत देऊन त्यांना घडविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असे डॉ. मिलिंद भोई आणि उदय जगताप यांनी सांगितले.