मुद्रांक शुल्कांतील सवलतीमुळे गेल्या वर्षापेक्षा अधिक दस्तनोंदणी

पुणे : राज्य शासनाने मुद्रांक शुल्कांत दिलेली सवलत आणि बांधकाम व्यावसायिकांकडून जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांचा परिणाम म्हणून यंदा दिवाळी-दसऱ्याच्या कालावधीत गतवर्षीपेक्षाही यंदा ३६ टक्के अधिक घरांची विक्री झाली आहे. करोना काळातील मरगळ दूर होऊन घरखरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे बांधकाम व्यावसायिकांची संघटना ‘क्रेडाई’ने स्पष्ट केले आहे. दस्त नोंदणीत गेल्या वर्षापेक्षा वाढ झाल्याच्या माहितीला राज्याचे नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी दुजोरा दिला असून, शासनाच्या सवलतीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आधीच मंदी असलेले बांधकाम क्षेत्र करोनाच्या कालावधीमध्ये आणखी खालावले होते. त्याला उभारी देण्यासाठी राज्य शासनाने २६ ऑगस्टला दस्त नोंदणीवरील मुद्रांक शुल्कात कपातीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी मुद्रांक शुल्कात तीन टक्क्यांनी, तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालवधीत ते दोन टक्क््यांनी कमी करण्यात आले आहे. मूळ मुद्रांक शुल्क शहरी भागात सहा टक्के, तर ग्रामीण भागात पाच टक्के आहे. शासनाच्या सवलतीनंतर घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शासनाच्या सवलतीबरोबरच काही बांधकाम व्यावसायिकांनी शून्य मुद्रांक शुल्क योजनाही राज्यात राबविली. त्यामुळेही घरखरेदीला प्रतिसाद वाढत गेल्याचे दिसून येते. के्रडाईच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुद्रांक शुल्कात राज्य शासनाने दिलेल्या भरीव सवलतीमुळे बांधकाम क्षेत्रावर त्याचा चांगला परिणाम झाला आहे. करोना कालावधीत घरनोंदणीत मोठी घट झाली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होऊन गेल्या वर्षीच्या सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यातील खरेदी व्यवहारापेक्षा ३६ टक्के अधिक व्यवहारांची नोंद झाली आहे. नोंदणी निरीक्षकांच्या अहवालानुसार गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये १.९० लाख दस्तांची नोंदणी झाली होती. त्याच्यात यंदा वाढ होऊन २.७३ लाख दस्तांची नोंदणी झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या केवळ १३ दिवसांतच राज्यभरात १.२१ लाख दस्तांची नोंदणी झाली आहे.

सणांच्या दिवसांत दस्त नोंदणीत वाढ होत असते, मात्र यंदा शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे दस्त नोंदणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. बाधकाम व्यावसायिकांनीही वैयक्तिक पातळीवर शून्य मुद्रांक शुल्क योजना राबविल्याचाही परिणाम झाला. मुद्रांक शुल्कातील ३ टक्क्यांची सवलत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर ती एक टक्क््यांनी कमी होणार आहे. त्यामुळे घरखरेदीदारांनी त्याचा लाभ घ्यावा. – ओमप्रकाश देशमुख, राज्य मुद्रांक आणि नोंदणी महानिरीक्षक

शासनाने मुद्रांक शुल्कात भरीव सवलत जाहीर केल्याने त्याचा बांधकाम व्यवसायावर चांगला परिणाम झाला. नागरिकांनी गुंतवणुकीसाठी घरखरेदीचा चांगला पर्याय निवडला. राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांनी करोनाच्या कालावधीत रोडावलेल्या घरखरेदीला चालना देण्यासाठी काही सवलतीही जाहीर केल्या. त्यामुळे नागरिकांनी उत्साह दाखविला आणि करोना कालावधीत थांबलेल्या घर खरेदीत मोठी वाढ झाली. – राजीव पारीख, अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र