पिंपरी-चिंचवड शहरात सकाळपासून करोना लसीकरणास सुरूवात झाली आहे. पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना लस देण्यात येत आहे. शहरातील पहिली लस घेण्याचा मान वैद्यकीय अधिकारी म्हणून पवन साळवी यांना मिळाला आहे. लस टोचल्यानंतर अर्धा तास त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणखाली ठेवण्यात आले. परंतु, कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम त्यांना जाणवले नाहीत. लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी येणाऱ्या काळात लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसेचे सचिन चिखले, राहुल कलाटे यांच्यासह आरोग्य कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये करोना लसीकरणाचे केंद्र असून, प्रत्येकी शंभर आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांना आज लस देण्यात येत आहे. सकाळपासूनच महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली होती. महापौरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर, आरोग्य अधिकारी पवन साळवी यांना शहरातील पहिली लस टोचून घेण्याचा मान मिळाला.

यावेळी ते म्हणाले की, ”आरोग्य अधिकारी या नात्याने पहिली लस टोचून घेतली आहे. लस घेऊन अर्धा तास उलटला आहे. मात्र, कोणताही त्रास होत नाही. नागरिकांनी लसीबद्दल मनात शंका बाळगू नये, निःसंकोचपणे लसीकरण करून घ्यावे. लस सुरक्षित असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.”

एकूण १५ हजार लशींचे डोस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला मिळाले असून १७ हजार आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी केली आहे.