मटणावर ताव मारताना जरा जपून खा…नुकतंच ५१ वर्षीय व्यक्तीच्या अन्ननलिकेत मटणाचे हाड अडकल्याने जीव धोक्यात आल्याची घटना समोर आली आहे. वसंत रोकडे असं या ५१ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. ते मूळचे अकलूज येथील असून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी त्यांच्यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करुन अन्ननलिकेत अडकलेले हाड काढण्यात डॉक्टरांना यश आलं.

पाच दिवसांपूर्वी रोकडे मटण खात होता तेव्हा अचानक एक हाड अन्ननलिकेत अडकले. विष्टेतून हाड बाहेर पडेल म्हणून त्यांनी दोन दिवस वाट पाहिली. पण नंतर जेवण करणं कठीण होऊ लागलं आणि अस्वस्थताही वाढली. उपाशी पोटी राहिल्याने आणि त्यातच हाडामुळे अन्ननलिका कापली जाण्याची दाट शक्यता होती. यावर अकलूज येथे उपचार होत नसल्याचे पाहून ते पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टर मंदार डोईफोडे यांच्याकडे आले. सकाळी त्यांच्या उचक्या थांबत नव्हत्या. मग डोईफोडे यांनी तातडीने दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून अन्ननलिका बाहेर काढली आणि रोकडे यांचा जीव वाचवला.