पुणे शहरात हेल्मेटसक्तीला विरोध करण्यात आल्याने लोकसत्ता ऑनलाइनने या संदर्भातला पोल घेतला. पुण्यात हेल्मेटसक्तीला होणारा विरोध योग्य आहे का? असा प्रश्न आम्ही पोलद्वारे विचारला होता. ६६ टक्के वाचकांनी विरोध योग्य नाही असे मत नोंदवले आहे. तर ३४ टक्के वाचकांनी विरोध योग्य आहे असे मत नोंदवले आहे. लोकसत्ताच्या ट्विटर पेजवर हा पोल ३ जानेवारी रोजी घेण्यात आला. ज्यामध्ये एकूण १५२२ वाचकांनी आपले मत नोंदवले.

ट्विटर पेजप्रमाणेच लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरही हाच प्रश्न वाचकांना विचारण्यात आला. ८४८ वाचकांनी आपले मत फेसबुकवर नोंदवले. ज्यापैकी ६२ टक्के वाचकांनी हेल्मेटसक्तीला विरोध नकोच असे म्हटले आहे तर ३८ टक्के वाचकांनी हेल्मेटसक्तीला होणारा विरोध योग्य आहे असे म्हटले आहे. ट्विटर आणि फेसबुक या दोन्हीकडच्या वाचकांचे प्रमाण पाहता विरोध नको म्हणणारेच वाचक जास्त आहेत. त्यामुळे आता लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांनीच हा पुणेकरांना हेल्मेटसक्तीस विरोध करू नका असा सल्ला दिला आहे.

पुण्यामध्ये सध्या हेल्मेट सक्तीवरून चांगलाचा वाद निर्माण झाला आहे. १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू केल्यानंतर पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यास सरुवात केली आहे. तर दुसरीकडे काहीही झाले तरी हेल्मेट घालणार नाही असा पवित्रा पुणेकरांनी घेतला आहे. अनेक ठिकाणी पुण्यातील नागरिकांनी आंदोलन करुन हेल्मेट सक्तीला विरोध केला. मात्र हा विरोध योग्य नाही असे आता लोकसत्ताच्या वाचकांनीही पुणेकरांना आपले मत नोंदवून दाखवून दिले आहे.