राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये (एनटीएस) मराठीसह स्थानिक भाषांना नाकारण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी दिला आहे. या परीक्षेशी थेट संबंध नसला तरी महाराष्ट्राच्या भावना राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन प्रशिक्षण परिषदेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे संचालक महावीर माने यांना निवेदन दिले. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत अचानक समावेश केलेला भाषिक कौशल्य हा विषय बाद करून पूर्वीप्रमाणेच बुद्धिमत्ता चाचणी आणि मॅट या विषयांचा अंतर्भाव करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.