भूमितीमध्ये बिंदूची व्याख्या नाही. पण, ज्याला लांबी-रुंदी आणि उंची नाही असे टिंब म्हणजे बिंदू अशी व्याख्या केली जाते. असे अनेक बिंदू जोडून रेषा तयार होते. पण, बिंदू या संकल्पनेचा चित्रनिर्मितीसाठी माध्यम म्हणून उपयोग करून घेतला आहे प्रभाकर पटवर्धन यांनी. त्यांच्या बिंदूचित्रांचे जग अनुभवण्याची संधी पुणेकरांना शनिवारपासून (२८ नोव्हेंबर) उपलब्ध झाली आहे. या कलेला त्यांनी सामाजिकतेची जोड दिली आहे.
प्रत्येक कलाकाराची आपापली शैली असते. या शैलीच्या माध्यमातून तो अभिव्यक्त होत असतो. माध्यम कोणतेही असले तरी कलेला मर्यादा नसतात. चित्रकलेमध्ये बिंदू हे माध्यम निवडून प्रभाकर पटवर्धन त्याद्वारे अभिव्यक्त होत असतात. बिंदू स्वरूपात म्हणजेच ‘स्टिपिलग’ ही कला आत्मसात करून त्यांनी चित्रकलेचा अनोखा आविष्कार घडविला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांना त्यांनी बिंदू स्वरूपामध्ये चित्रबद्ध केले आहे.
पटवर्धन यांच्या बिंदूचित्रांचे प्रदर्शन शनिवारपासून तीन दिवस बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते शनिवारी सकाळी दहा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून ज्येष्ठ भरतनाटय़म नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन विनाशुल्क खुले राहणार आहे. मात्र, या प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांच्या ‘महारोगी सेवा समिती’ला देण्यात येणार आहे. या संस्थेला देणगी देऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रदर्शनाच्याठिकाणी पेटी ठेवण्यात येणार असून त्यामध्ये धनादेश टाकावेत, असे आवाहन पटवर्धन यांनी केले आहे. कलाप्रेमी रसिकांसाठी सोमवापर्यंत (३० नोव्हेंबर) दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.