24 September 2020

News Flash

‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’वर विश्वास नाही! – डॉ. कलाम

‘‘वयाच्या विशी-पंचविशीत तुमच्या डोळ्यांसमोर काहीतरी मोठे ध्येय असायला हवे. विजेच्या दिव्याकडे पाहिले की आपल्याला एडिसनच आठवतो. इतके मोठे होण्याचे ध्येय बाळगणे आवश्यक आहे.''

| July 5, 2014 03:25 am

‘‘वयाच्या विशी-पंचविशीत तुमच्या डोळ्यांसमोर काहीतरी मोठे ध्येय असायला हवे. विजेच्या दिव्याकडे पाहिले की आपल्याला एडिसनच आठवतो. इतके मोठे होण्याचे ध्येय बाळगणे आवश्यक आहे. ‘बलवान व्यक्तीचाच स्पर्धेत टिकाव लागेल’ असे सांगणाऱ्या ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’च्या सिद्धांतावर माझा विश्वास नाही. ज्ञान मिळवण्याची उत्कंठा, प्रचंड मेहनत करण्याची तयारी आणि चिकाटी या गोष्टी ज्याच्याकडे असतील तो ध्येय गाठणारच,’’ असे प्रेरक मत माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाइल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) संशोधकांच्या सभेत प्रमुख पाहुणे म्हणून कलाम बोलत होते. संस्थेचे संचालक डॉ. सौरव पाल या वेळी उपस्थित होते. संशोधनाच्या विद्यार्थ्यांनी या वेळी कलाम यांना उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. एखाद्या संशोधनात पुन:पुन्हा अपयश येत असल्यास काय करावे, यशाची तुमची व्याख्या काय, जीवनात कुणाला आदर्श मानावे, प्रचंड स्पर्धेला तोंड कसे द्यावे अशा प्रश्नांची कलाम यांनी आपल्या नेहमीच्या खेळकर शैलीत उत्तरे दिली.
कलाम म्हणाले, ‘‘विज्ञान असो किंवा राजकारण असो, कोणत्याही मानवी प्रयत्नाला कधी ना कधी अपयश येणारच. परंतु प्रश्नाला तुमचा कब्जा कधीच घेऊ देऊ नका, त्यावर स्वार व्हायला शिका. कल्पनाशक्ती आपल्या विचारांना चालना देते आणि विचारांची पुढची पायरी म्हणजे ज्ञान. सतत ज्ञान मिळवत राहणे, त्यासाठी वाचत राहणे गरजेचे आहे. यश ही एक अखंड चालणारी प्रक्रिया (कंटिन्युअस प्रोसेस) आहे. कधी यश आणि कधीतरी अपयश हा त्या खेळाचा भागच असतो.’’            
‘कोणाला आदर्श मानावे,’ या प्रश्नाचे उत्तर देताना कलाम यांनी आपण उड्डाण विज्ञानाकडे कसे आकर्षित झालो याची गोष्ट सांगितली. ते म्हणाले,‘‘मी प्राथमिक शाळेत होतो तेव्हा आम्हाला शिकवायला शिवा सुब्रह्मण्याम अय्यर नावाचे शिक्षक  होते. तमीळ आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि गांधीविचार मानणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. ‘पक्षी कसे उडतात,’ यावर त्यांनी वर्गात घेतलेला तास मला चांगलाच आठवतोय. त्याच वेळी मी ठरवलं होतं की आपण उडण्यासंबंधी काहीतरी करायचं!’’
‘मूलभूत विज्ञानाशी संबंधित संशोधन हवे’
जागतिक स्तरावरच्या देशाच्या स्पर्धाक्षमतेविषयी बोलताना कलाम म्हणाले, ‘‘देशाच्या संशोधन क्षेत्रात सुधारणांचे पर्व (रेनेसान्स) कधी येणार असा प्रश्न नेहमी विचारला जातो. मूलभूत विज्ञानाशी संबंधित संशोधनातूनच अद्ययावत तंत्रज्ञान विकसित होऊ शकते. हे तंत्रज्ञान देशाची जागतिक स्पर्धाक्षमता सिद्ध करेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धाक्षमता अहवालानुसार (२०१३-१४) भारताचा जगात सध्या साठावा क्रमांक लागतो. या क्रमांकावरून देश दहाव्या क्रमांकापर्यंत पोहोचावा यासाठी संशोधन फार महत्त्वाचे आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2014 3:25 am

Web Title: dr apj abdul kalam survival fittest ncl
Next Stories
1 पुणेकर ऑनलाइन ग्राहकांची ‘फास्ट फूड’ला पसंती!
2 आधी पैशांचं बोला..
3 वीज कंपन्यांवर अंकुश ठेवणारी नवी कृती मानके अखेर लागू
Just Now!
X