स्वत:च्याच घरात चोरी करून नंतर पोलिसांकडे चोरी झाल्याची तक्रार देत बनाव रचणाऱ्या भामटय़ाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरीच्या मालासह अटक केली आहे. दारूच्या व्यसनामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी हा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे.
पंकज चंद्रकांत दिघे (वय २०, रा. भालेकर चाळ, नळस्टॉपजवळ, कर्वेरस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दिघे हा मार्केटिंगची कामे करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या पहिल्या आठवडय़ात दिघे याची आई व बहीण घराबाहेर गेलेल्या असताना घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी दिघे याने दिलेल्या तक्ररीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होता. या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस ठाण्याबरोबर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक सुनिल देशमुख हे करीत होते.
या गुन्ह्य़ाचा तपास करीत असताना पोलिसांना फिर्यादी असलेल्या दिघेवरच त्यांचा दाट संशय होता. युनिट एकचे कर्मचारी सिद्धराम कोळी यांना दिघे याला दारूचे व्यसन असून त्याकरिता त्याच्याजवळ असलेले दागिने विक्री करण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारूती चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक देशमुख आणि सहायक पोलीस निरीक्षक बाहवे यांनी सोन्या मारूती चौकात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे चोरीला गेलेल्या मालापैकीच पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र मिळून आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने स्वत: चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्यासाठी अनेकांकडून उसणे पैसे घेतले होते. उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी पैशाची आवश्यकता होती. हे पैसे नसल्यामुळे दिघे याने घरातच चोरी करण्याचा ठरविले. घरातून आई आणि बहीणा बाहेर गेल्यानंतर तो घरी आला आणि कपाटातील सोने, रोख रक्कम असा दोन लाखांचा ऐवज चोरून निघून गेला. थोडय़ा वेळात त्याची आई घरी आल्यानंतर घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याने त्यांनी दिघेला बोलविले. त्याने आपल्या घरात चोरी झाल्याचे सांगून पोलिसांकडे खोटी तक्रार सुद्धा दिली. पण, त्याचा बनाव पोलिसांच्या लक्षात आला. त्याला अटक करून डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.