जगविख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘टायटस अंड्रोनिकस’ या नाटकाचे प्रयोग भारतासह अमेरिका आणि दक्षिण अफ्रिका या तीन देशांमध्ये होणार आहेत. मिडास आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिग आर्ट्स अँड रिसर्च (आयएपीएआर) यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेतील जॉर्जटाऊन विद्यापीठ आणि दक्षिण अफ्रिकेतील केपटाउन विद्यापीठ यांच्या सहकार्याने टायटस प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.
या प्रकल्पाचा फायदा पुणेकर रंगकर्मीना मिळावा, या उद्देशाने रंगकर्मीना आवाहन करण्यात आले आहे. जगभरातील समविचारी कलाकारांशी संवाद साधण्यासाठी आणि मुक्तपणे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी प्रतिभावान कलाकारांसाठी हे सुयोग्य व्यासपीठ आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी भाषेचा अडथळा नाही. नाटय़निर्मिती ही बहुभाषिक असण्याची शक्यता आहे. पण, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी एका भाषेचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. सहभाग घेण्यासाठी १६ ते ३५ वर्षे वयोगटातील रंगकर्मीनी आपला प्रवेश अर्ज १८ नोव्हेंबपर्यंत भरून देणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांना २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळात होणाऱ्या कार्यशाळेस उपस्थित राहावे लागेल.
या कार्यशाळेतून काही रंगकर्मीची निवड पुढील पाच आठवडय़ांत होणाऱ्या १५ दिवसांच्या कार्यशाळेसाठी करण्यात येणार आहे. कार्यशाळेच्या अखेरीस निवड झालेल्या अंतिम कलाकारांसमवेत ‘आयएपीएआर’चे संस्थापक-संचालक प्रसाद वनारसे आणि अमेरिकेतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रा. जेफ्री सेशेल ‘टायटस अंड्रोनिक’ हे नाटक दिग्दर्शित करणार आहेत. या कार्यशाळेचे प्रवेश अर्ज http://www.midasindia.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या प्रकल्पासंबंधी अधिक माहितीसाठी निखिल गाडगीळ (मो. क्र. ९०११०८३१२७) किंवा डॉ. अजय जोशी (मो. क्र. ९८२२१९०९७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.