आपल्या आईसोबत काही दिवसांपूर्वी आजोळी आजीकडे आलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीवर एका बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्यातील साकोरे येथे रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, श्रुतिका महेंद्र थिटे (वय ५) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रुतिकावर हल्ला चढवला. श्रुतिका आणि तिची आई पाच दिवसांपूर्वीच साकोरे येथे आल्या होत्या. परंतू, असे काही अघटित घडेल असे श्रुतिकाच्या आईला वाटले नसेल. बिबट्याने श्रुतिकाच्या गळ्याला चावा घेतला होता.

सविस्तर माहिती अशी, श्रुतिकाची आई स्वाती महेंद्र थिटे या पाच दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी आपल्या मुलीसह माहेरी आल्या होत्या. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घरासमोरील शेतात श्रुतिकाची आज्जी कुसुम कडूसकर आणि आई स्वाती थिटे या जनावरांसाठी मका कापत होत्या तर जवळच श्रुतिका खेळत होती. दरम्यान, मक्याच्या पिकात दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक श्रुतिकावर हल्ला चढवला आणि तिला जबड्यात (तोंडात) उचलून पळू लागला. हे पाहताच आई आणि आज्जीने आरडाओरडा करीत परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. मात्र, तोपर्यंत बिबट्या श्रुतिकाच्या गळ्याचा चावा घेऊन तिला तिथेच टाकून पळून गेला होता.

श्रुतिकाच्या गळ्याला गंभीर जखम झाल्याने त्या अवस्थेत श्रुतिकाला प्रदीप कडूसकर यांनी आपल्या वाहनातून तत्काळ मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, उपचारांपूर्वीच श्रुतिकाचा मृत्यू झाला. बिबट्याने श्रुतिकाच्या गळ्याला चावा घेतल्याने आणि मोठ्या प्रमाणावर रक्तश्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, वनखात्यामार्फत संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून कळते.