पुणे शहरासह जिल्ह्यातील ५ तालुक्यांना काल रात्री धुवांधार पावसाचा फटका बसला. शहरांसह ग्रामीण परिसरातील सखल भागात घरांमध्ये पाणी शिरले, नदी-नाल्यांना पूर आले. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १४ जण दगावले असून ९ जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची ५ पथके कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले, यावर्षी २२ वर्षानंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात धरणे भरली. काल रात्रीचा पाऊस मात्र खूपच होता. यावर्षी जिल्ह्यात सरासरी १८० टक्के पाऊस झाला आहे. कालच्‍या पावसामुळे जिल्ह्यात १४ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पुणे शहरातील ६, हवेली तालुक्यातील ६, पुरंदर तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे.

या पावसाचा फटका जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ५ तालुक्यांना बसला आहे. पाच तालुक्यातील ५९ गावे बाधित झाली आहेत. नाझरे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कऱ्हा नदीच्या पात्रात ८५ हजार क्युसेक पाणी वाहत होते. या कऱ्हा नदीच्या पाण्यामुळे बारामती शहराला फटका बसला. दक्षतेचा उपाय म्हणून बारामती शहरात ३८ निवारा शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे. या शिबिरात २ हजार ५०० नागरीकांना स्थलांतरीत करण्यात आले. तर पुणे शहरातील ३ हजार नागरिकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. जिल्ह्यातील १ हजार १ कुटुंबांतील ३ हजार ६५ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात दरड कोसळून ५ रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून या रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. जिल्ह्यात ५ एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या असून २७५ जवान मदतकार्य करीत आहेत. यांपैकी बारामती तालुक्यात एनडीआरएफच्या दोन टीम कार्यरत आहेत. या आपत्कालीन स्थितीची माहिती निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनांनुसार प्रशासनाच्यावतीने बाधीत नागरिकांना मदत देण्यात येणार आहे. आचारसंहितेचा कोणताही अडसर मदत व बचावकार्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.