सफरचंदाच्या बागांचे नुकसान

काश्मीरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे सफरचंदाचे मोठे नुकसान झाले आहे. बर्फवृष्टीमुळे पुण्यातील फळ बाजारात होणारी सफरचंदाची आवक कमी झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत असल्यामुळे तेथील सफरचंदाच्या झाडांचे मोठे नुकसान होत आहे.

काश्मीरमध्ये साधारणपणे डिसेंबरमध्ये बर्फवृष्टी सुरू होते. यंदाच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. बर्फवृष्टीचा सर्वाधिक फटका सोफियान, पुलगाम, अनंतनाग, पुलवामा या चार जिल्हय़ांना बसला आहे. सफरचंदांनी लगडलेली झाडे बर्फवृष्टीमुळे अक्षरश: फाटली आहेत. बर्फवृष्टीमुळे सफरचंदांचे मोठे नुकसान झाले आहे. बर्फवृष्टीमुळे सफरचंदाचे उत्पादन तसेच व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. जम्मू-काश्मीर सरकारने सफरचंद व्यवसायाचे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे जाहीर केले आहे, अशी माहिती गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील सफरचंदाचे व्यापारी सुयोग झेंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

ते म्हणाले, सफरचंदाच्या वाहतूक करणाऱ्या गाडय़ा बर्फवृष्टीमुळे काश्मीरमध्ये अडकून पडल्या आहेत. एरवी काश्मीरमधून पुण्यात सफरचंद घेऊन येणाऱ्या गाडय़ा साधारणपणे पाच दिवसांत पुण्यात दाखल व्हायच्या. आमचा काश्मीरमधून सफरचंद आणून विक्रीचा व्यवसाय आहे. सध्या काश्मीर ते पुणे या प्रवासासाठी अकरा दिवस लागत आहेत. सध्या बाजारात सफरचंदाचे चार ते पाच ट्रक बाजारात येत आहेत. एकूण मिळूण चार ते पाच हजार सफरचंदाच्या पेटय़ा एवढी आवक होत आहे. ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यापर्यंत काश्मिरी सफरचंदांचा हंगाम असतो. दरवर्षी डिसेंबर महिन्यात बर्फवृष्टी होते. यंदाच्या वर्षी पंधरा ते सोळा वर्षांनंतर काश्मीरमध्ये नोव्हेंबरमध्ये मोठय़ा प्रमाणावर बर्फवृष्टी झाली असल्याची माहिती काश्मीरमधील सफरचंद उत्पादकांनी दिली आहे. काश्मीरमधील सफरचंद उत्पादकांनी तोडणी केलेल्या सफरचंदाची साठवणूक केली होती. सध्या तोडणी केलेली सफरचंद बाजारात विक्रीस पाठवली जात आहेत. बर्फवृष्टीमुळे सफरचंदाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक झाडांवर सफरचंद लगडलेली आहेत. मात्र, बर्फवृष्टीमुळे झाडे फाटली आहेत. त्यामुळे सफरचंदाच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे.

सफरचंदाच्या पेटीचे दर वाढले

सफरचंदाच्या पेटीच्या दरात शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. पेटीचा दर ९०० ते ११०० रुपये दरम्यान आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलो सफरचंदाचे दर ९० ते १२० रुपये किलो आहेत.