महापालिकेच्या शाळांमध्ये बसविण्यात येणाऱ्या ई-लर्निग अभ्यासक्रमाला बालभारतीची मान्यता नसल्यामुळे ई-लर्निग प्रणाली विकसित करून देण्याचे काम एका खासगी संस्थेला देण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू झाल्या आहेत. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून त्यासाठी दबाव टाकला जात असून त्यामुळे पालिकेची ई-लर्निग प्रणाली वादात सापडण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या शाळांसाठी सन २०१८-१९ या शैक्षिणक वर्षांपासून ई-लर्निग अभ्यासक्रम सुरू करण्याचे महापालिकेने निश्चित केले होते. भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या संस्थेला हे काम देण्यात आले होते. मात्र ई-लर्निग अभ्यासक्रम सुरू करण्याचा महापालिकेचा हा प्रस्ताव सातत्याने वादात सापडला होता. या अभ्यासक्रमाला बालभारतीची आवश्यक ती मान्यता नसल्याचेही पुढे आले होते. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात सखोल चौकशी करून अहवाल ठेवण्याचे आदेश दिले होते. अभ्यासक्रमाला मान्यता नसल्यामुळे अभ्यासक्रमाची तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी आणि संबंधित विषयांच्या तज्ज्ञ शिक्षकांची समिती स्थापन करण्यात येईल, असे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यास पाच महिन्यानंतर मुहूर्त मिळाला असला तरी ई-लर्निग प्रणालीचे काम अन्य एका संस्थेला देण्याचा घाट महापालिकेत घालण्यास सुरुवात झाली आहे.

अहवाल सादर होणार

अभ्यासक्रमाची तपासणी करण्यासाठी पालिकेने समिती स्थापन केली आहे. यात संबंधित विषयांचे तज्ज्ञ शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपशिक्षण प्रमुख यांचा समावेश आहे. या समितीला पुढील २०  दिवसांत हा अभ्यासक्रम तपासून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.