यांत्रिकी पद्धतीवर आधारित स्वच्छतागृहे उभारणीस सुरुवात
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांतील अस्वच्छता आणि त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असतानाच आता शहरात स्वच्छता आणि टापटीप असणारी तसेच यांत्रिकी पद्धतीवर आधारित स्वच्छतागृहांची उभारणी होणार आहे. डेक्कन कॉर्नरनंतर आता महत्त्वाच्या जंगली महाराज रस्त्यावर ई-टॉयलेट्सची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
शहरातील स्वच्छतागृहांची उभारणी महापालिकेकडून होते. मात्र स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता, मूलभूत सुविधांचा अभाव, त्यांची देखभाल दुरुस्ती हे प्रश्न सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे पूर्णपणे यांत्रिकी पद्धतीवर आधारित स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. खासदार अनिल शिरोळे यांच्या विकास निधीतून शहरात अकरा ठिकाणी चौदा ई-टॉयलेट्स उभारण्याचा प्रस्ताव असून त्या अंतर्गत जंगली महाराज रस्त्यावरील ई-टॉयलेटची सुविधा गुरुवारपासून नागरिकांना उपलब्ध होणार आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर शहरात ई-टॉयलेट्सची उभारणी होणार आहे. स्वयंचलित प्रणाली, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा या स्वच्छतागृहांमध्ये असणार आहेत.
शहरातील जंगलीमहाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, मॉडेल कॉलनी, हिरवाई गार्डन या उच्चभ्रू भागाबरोबरच भैरोबा नाला, गोखलेनगर, रामोशी वस्ती, कामगार पुतळा, कर्वेनगर येथील मावळे आळी आणि दांडेकर पूल वसाहतीजवळ ही स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. त्याला मान्यताही देण्यात आली होती.
मानवविरहित स्वच्छता आणि स्वयंचलित प्रणाली ही स्वच्छतागृहांची वैशिष्टय़े आहेत. स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी नाणे (कॉईन) टाकल्यानंतरच त्याचा वापर करता येणार आहे. स्वच्छतागृहाचा वापर झाल्यानंतर तत्काळ त्याची साफसफाई यंत्राद्वारे होणार असून साफसफाई झाल्याशिवाय त्याचा वापर करता येणार नाही. त्यामुळे स्वच्छतागृहांमधील स्वच्छता आणि साफसफाई कायम राहण्यास मदत होणार आहे. देशातील अनेक शहरांत या पद्धतीचा अवलंब होत असून पुण्यात प्रथमच अशी स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र रॅम्प आणि लोखंडी बारची यामध्ये व्यवस्था असणार आहे.
अकरा ठिकाणांचा प्रस्ताव
या स्वच्छतागृहांची मानवविरहित साफसफाई होणार आहे. सध्या अकरा ठिकाणी चौदा ई-टॉयलेट्स उभारणीचा प्रस्ताव आहे. यात १२ ई-टॉयलेट्स ही महिलांसाठी तर दोन स्वच्छतागृहे पुरुषांसाठी आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
स्वच्छतागृहांची दुरवस्था
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि त्यांची दुरवस्था कायम चर्चेचा विषय ठरला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्याही कमी असून स्वच्छतागृहांच्या उभारणीचे निकषही पाळले जात नसल्याचे पुढे आले आहे. सध्या किमान पाचशे व्यक्तींमागे एक या प्रमाणे शहरात स्वच्छतागृहांची संख्या असून महिला स्वच्छतागृहांची संख्या तर त्यापेक्षा खूप कमी आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची ही वस्तुस्थिती ‘लोकसत्ता’ने सातत्याने मांडली आहे.