शिक्षण संस्थांजवळ शंभर यार्ड परिघामध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यात येऊ नये, या नियमाला हरताळ फासून पुण्यात महाविद्यालयांच्या गेटमध्येच पानपट्टय़ा उभारून तंबाकू, सिगारेट यांची सर्रास विक्री होताना दिसत आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागातील बहुतेक शिक्षणसंस्थांच्या बाहेर पानपट्टय़ा आहेत.
‘सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्री कायदा २००३’ मधील कलम ६ (ब) नुसार कोणतीही शाळा, महाविद्यालय वा शिक्षण संस्थेच्या १०० मीटर परिघामध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीला बंदी आहे. यात सिगारेटचाही समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील बहुतेक महाविद्यालयांच्या जवळ पानपट्टय़ांवर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सर्रास होताना दिसते. यातील बहुतेक पानटपऱ्या या नोंदणीकृतही नाहीत. एफडीएच्या आकडेवारीनुसार शहरात सध्या १४८७ नोंदणीकृत पानाच्या टपऱ्या आहेत. पण प्रत्यक्षात पुण्यात २० ते ३० हजार पानाची दुकाने असल्याची माहिती तंबाखू व्यावसायिक शांतिलाल सुरतवाला यांनी दिली.
पुण्यातील मध्यवर्ती भागातील अनेक महाविद्यालयांजवळ पानपट्टय़ा आहेत. फग्र्युसन महाविद्यालाच्या मुख्य गेट समोर, शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या गेट समोर, नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या गेट बाहेर, गरवारे महाविद्यालयाच्या सेंट्रल मॉल समोरच्या गेटबाहेर चहाच्या टपरीवर सिगारेट, तंबाखूची विक्री होते. स. प. महाविद्यालयाच्या गेट समोर, नळस्टॉप जवळील सिंहगड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटच्या गेट बाहेर, भावे प्रशालेच्या गेट समोर, विमलाबाई गरवारे प्रशालेच्या समोर, डेक्कन पोलिस चौकीजवळ या आणि अशा अनेक शिक्षणसंस्थांच्या गेटमध्येच पानपट्टय़ा थाटलेल्या आहेत. या पानपट्टय़ांवर गर्दीही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीच दिसून येते. मात्र, त्यावर कारावाई होताना दिसत नाही. प्रशासनाकडून ही जबाबदारी महाविद्यालयांवर ढकलण्यात आली आहे. महाविद्यालयाने तक्रार केली, तरच कारवाई करता येते. मात्र, महाविद्यालयाकडून तक्रारी येत नाहीत.
प्रशासन काय म्हणते?
अन्न विभागाच्या (एफडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि सुगंधी सुपारीची विक्री राज्यात कुठेच करता येणार नसून शाळा व महाविद्यालयांपासून १०० यार्डाच्या परिघात या व इतरही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यावर बंदी आहे. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात या पदार्थाची विक्री होताना आढळल्यास एफडीएबरोबरच पोलिसांनाही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्याबरोबरच शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षणाधिकाऱ्यांनाही या याप्रकरणी कारवाईचे अधिकार आहेत.’’
महाविद्यालयाची भूमिका काय?
बहुतेक महाविद्यालयांच्या आवारात धूम्रपान करण्यास किंवा तंबाखू खाण्यास बंदी आहे. त्याची अंमलबजावणीही होताना दिसते. मात्र, गेटच्या बाहेर शंभर मीटर परिसरामध्ये असलेल्या पानपट्टय़ांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य नसल्याचे प्राचार्याचे म्हणणे आहे. प्रशासनाकडे तक्रार करूनही टपऱ्या हलवल्या जात नसल्याचेही काही प्राचार्यानी सांगितले.
‘‘महाविद्यालयाच्या बाहेर नियंत्रण ठेवणे शक्य नाही. शंभर यार्डच्या परिघामध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यासाठी बंदी आहे, अशा अर्थाची सूचना शिक्षणसंस्थांनी त्यांच्या गेटबाहेर लावायची आहे. त्याप्रमाणे ती लावलेली आहे. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या आवारामध्ये धूम्रपान होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. महाविद्यालयाच्या आवारात नियम मोडणाऱ्यांवर कारवाईही केली जाते. मात्र, महाविद्यालयाच्या बाहेर होणाऱ्या विक्रीवर शासनानेच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ज्या वेळी पानटपऱ्यांना लायसन्स दिली जातात, त्याचवेळी ती शिक्षणसंस्थेच्या जवळ सुरू होत नाही ना याची खातरजमा करणे शासनाला सहज शक्य आहे.’’
– डॉ. राजेंद्र झुंझारराव, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर
काय कारवाई होऊ शकते?
कायद्यानुसार शाळा व महाविद्यालयांपासून १०० यार्डाच्या परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होताना आढळल्यास  विक्रेत्याला अधिकाधिक २०० रुपये दंड होऊ शकतो. २०० रुपये ही पानपट्टीधारकांच्या एका दिवसाच्या कमाईपेक्षाही कमी रक्कम आहे. त्यामुळे या कारवाईचा प्रत्यक्षात विक्रेत्यांना काहीच फरक पडत नाही. त्यामुळे कारवाई झालीच, तरी या पानपट्टय़ा पुन्हा आहे त्या जागीच राहतात.
‘‘हा गुन्हा पुन्हा पुन्हा आढळल्यास संबंधित विक्रेत्याची नोंदणी किंवा परवाना एफडीए रद्द करू शकते. जर विक्रेत्याकडे परवाना आढळला नाही, तर परवाना न घेतल्याबद्दल त्याच्यावर खटले दाखल होऊ शकतात.’’
– शशिकांत केकरे, सहआयुक्त अन्न विभाग
आजपर्यंत झालेली कारवाई
एप्रिल २०१२ पासून आजपर्यंत शंभर यार्डाचा नियम आणि सार्वजनिक ठिकाणी कुठेही धूम्रपान करणे या दोन्ही गोष्टींमध्ये २१३ प्रकरणांमध्ये कारवाई झाली आहे. यामध्ये आतापर्यंत ३६ हजार ५० रूपयांची दंडवसुली झाली आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!