|| प्राची आमले

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर हे आजच्या पिढीच्या जगण्यातले परवलीचे शब्द झालेत. आपल्यापैकी अनेकांना पुस्तक उघडून ते वाचायचा कंटाळा येत असेल, पण व्हॉटसअ‍ॅपवर आलेले मेसेज आपण आवडीने वाचतो आणि शेअरही करतो. सोशल मीडियाची हीच ताकद ओळखून चांगली माहिती अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या ही माध्यमं प्रभावीपणे वापरली जाताना दिसतात. त्यातलाच एक वापर म्हणजे विज्ञान सर्व स्तरांमध्ये पोहोचवण्यासाठी आलेलं ‘संशोधन’चं फेसबुक पेज आणि वेबसाईट!

समाजमन बिघडवणारं, अफवा पसरवणारं, खोटी माहिती पुरवणारं अशी समाजमाध्यमांची प्रतिमा समाजात तयार झालेली असताना फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर  आणि आता संकेतस्थळ यांचा वापर विज्ञानविषयक माहितीच्या प्रचार आणि प्रसारासाठी करता येऊ शकतो हे दाखवणारं काम मयुरेश प्रभुणे यांनी केलं आहे.

चालू घडामोडी, नवे शोध, विविध वैज्ञानिक संकल्पना, आकाशदर्शन, प्रदर्शनं, कार्यशाळा, वैज्ञानिक अभ्यासक्रम अशी विज्ञान विश्वातील अभूतपूर्व माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी या हेतूने त्यांनी ‘संशोधन’ या नावाच्या फेसबुक पेज आणि संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. विज्ञान विश्वातला प्रचंड असा माहितीचा खजिना लोकांना आता  एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

प्रदर्शनं, कार्यशाळा, विज्ञान सहली, मासिकं अशा विविध माध्यामांतून विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम मयुरेश प्रभुणे गेली १९ वर्षे करत आहेत. बदलत्या काळाची पावलं ओळखून इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर या समाजमाध्यमातून समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत प्रभावीपणे माहिती पोहोचवण्याचे काम सध्या होताना दिसतं पण विज्ञानविषयक माहिती पोहोचवणारं एकतरी अधिकृत संकेतस्थळ असावं आणि सध्या विज्ञान विश्वातील माहिती व्यापक स्वरूपात पण सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या हेतूने संशोधन या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे लेख, शास्त्रज्ञांशी लाईव्ह संवाद, राष्ट्रीय संशोधन संस्थाच्या प्रयोगशाळा किंवा अगदी वेधशाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील कामाचा परिचय लाईव्ह स्वरुपात राज्यातील अनेक शाळांना एकाच वेळी करून देणे, विज्ञान क्षेत्रात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, शिष्यवृत्तीविषयक उपक्रमांची माहिती या संकेतस्थळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये विज्ञानाचा प्रसार करणे व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे हे संकेतस्थळाच्या निर्मितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे, अशी माहिती मयुरेश प्रभुणे यांनी दिली.

राज्यातील  शाळा व महाविद्यालयांना संकेतस्थळाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. शाळा  व महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी संकेतस्थळाची नोंदणी मोफत ठेवण्यात आली असून येत्या काही काळात नियमितपणे दर्जेदार विज्ञान साहित्य आणि माहिती समाजमाध्यमांचा वापर करत शेकडो शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. प्रभुणे म्हणाले, हे संकेतस्थळ मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असेल. विज्ञानविषयक माहिती पुरवणारे हे पहिले मराठी संकेतस्थळ आहे. विविध वैज्ञानिक प्रदर्शन, कार्यशाळा याविषयीची माहिती समाजमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाते. समाजमाध्यम हे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे उत्तम साधन असून याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. आमच्या सर्व उपक्रमांची माहिती आम्ही समाजमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवत असतो.

विज्ञान क्षेत्रात करीअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे संकेतस्थळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. विज्ञानविषयाची अधिकृत माहिती पुरविणारे पहिले संकेतस्थळ  असून त्यामुळे विद्यार्थी अभ्यासक्रमात, शोधनिबंधात देखील  संदर्भ म्हणून माहितीचा वापर करू शकतात. भारतातील नामांकित प्रयोगशाळांतील शास्त्रज्ञ वैज्ञानिक संकल्पना व्हिडीओ मार्फत सोप्या भाषेत समजावणार आहे. मराठीमध्ये माहिती वाचणाऱ्यांची संख्या ही इंग्रजीमध्ये वाचणाऱ्यांच्या संख्येपेक्षा पाचपट जास्त आहे. येत्या काळात संकेतस्थळ अधिक व्यापक बनविण्यात येणार आहे. जगभरातील सर्व स्तरांपर्यंत जाऊन विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार समाजमाध्यामांतर्फे करण्यात येणार आहे, असे ही प्रभुणे यांनी यावेळी सांगितले. संशोधन इंडिया या नावाने फेसबुक पेज तर संशोधन डॉट इन हे संकेतस्थळ कार्यरत आहे.